बातम्या
विवेकानंद कॉलेजचा माजी विद्यार्थी हर्षवर्धन पाटील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 349 व्या रँकने उत्तीर्ण
By Administrator - 3/14/2026 1:47:49 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजचा माजी विद्यार्थी हर्षवर्धन पाटील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 349 व्या रँकने उत्तीर्ण
कोल्हापूर दि. 14 : विवेकानंद कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापासूनच विद्यार्थ्यांना संघर्षाला सामोरे जावे लागत असते. त्यामुळे विद्यार्थ्यामध्ये नैसर्गिकरित्याच कष्ट करण्याची जिद्द निर्माण होते. विवेकानंद कॉलेजमधील शैक्षणिक वातावरण स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त् असे आहे. येथील शिक्षकांचे मार्गदर्शन व महाविद्यालयाने पुरविलेल्या सोयी सुविधांमुळेच मी यशाला गवसणी घालू शकलो. माझ्या या यशात विवेकानंद कॉलेजचा सिंहाचा वाटा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत 349 व्या रँकने उत्तीर्ण झालेला विवेकानंद कॉलेजचा माजी विद्यार्थी हर्षवर्धन पाटील याने केले. ते श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था व विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार सोहळयात बोलत होते.
अध्यक्षीय मनोगतात संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी, युपीएससी ही भारतातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठित परीक्षा मानली जाते. लाखो युवक युवती या परीक्षेची वर्षानुवर्षे तयारी करतात. अशा परीक्षेत यश मिळविणे म्हणजे केवळ बुध्दीमत्ता नाही तर दृढ निश्च्य, स्वयंशिस्त, संयम आणि अथक परिश्रम यांची गरज असते. हर्षवर्धन पाटील याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत मिळविलेले हे यश निश्चितच उल्लेखनीय व कौतुकास्पद आहे. त्याचे हे यश विवेकानंद कॉलेज व संस्थेचा नावलौकिक वाढविणारे आहे. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजीं साळुंखे यांच्या तत्वज्ञानाचा अंगिकार करुन हर्षवर्धनने प्रशासकीय सेवेत स्वत:च्या कर्तृत्वाचा ठसा उमटवावा, असे मत मांडले. यावेळी हर्षवर्धन पाटील यांचे वडील प्रा.एच.पी.पाटील यानी हर्षवर्धनच्या शैक्षणिक प्रवासाविषयीचे मनोगत मांडले.
हर्षवर्धन पाटील याचे माध्यमिक शिक्षण श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे झाले, तर उच्च माध्यमिक शिक्षण विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथे झाले. हर्षवर्धन पाटील यांचे वडील प्रा. हरिश्चंद्र पाटील हे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.
हर्षवर्धन पाटील याच्या यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र इ. देऊन त्याचा सत्कार केला. याप्रसंगी संस्था सेक्रेटरी मा.प्राचार्या सौ. शुभांगी गावडे व संस्थेचे मुख्य्ा कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, विवेकानंद कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ.सी.बी.पाटील, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समनवयक डॉ.श्रुती जोशी,रजिस्ट्रार श्री.एस.के.धनवडे, सहा.ग्रंथपाल हितेंद्र साळुंखे, महाविद्यालयातील स्टाफ सेक्रेटरी, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांनी हर्षवर्धन पाटीलचे अभिनंदन केले.
विवेकानंद कॉलेजचा माजी विद्यार्थी हर्षवर्धन पाटील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 349 व्या रँकने उत्तीर्ण
|