बातम्या
शिवाजी विद्यापीठ युवा महोत्सवात सलग 18 वर्षे विवेकानंद कॉलेज अव्वल
By nisha patil - 10/16/2026 2:52:40 PM
Share This News:
शिवाजी विद्यापीठ युवा महोत्सवात सलग 18 वर्षे विवेकानंद कॉलेज अव्वल
विवेकानंद कॉलेजला युवा महोत्सव जनरल चॅम्पियनशीप
कोल्हापूर दि. 16 : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या मध्यवर्ती ४६ व्या युवा महोत्सव २०२६–२७ मध्ये विवेकानंद कॉलेज, कोल्हापूरच्या विद्यार्थी कलाकारांनी विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे. मुधोजी महाविद्यालय फलटण येथे संपन्न झालेल्या 46 व्या शिवाजी विद्यापीठाच्या युवा महोत्सवांमध्ये विवेकानंद महाविद्यालयास वैयक्तिक व सांघिक स्पर्धांमध्ये जनरल चॅम्पियनशिप मिळविली आणि शिवाजी विद्यापीठ युवा महोत्सवात अव्वल येण्याचा बहुमान पटकावला.
एकापेक्षा एक सरस सादरीकरणे, कलागुणांची प्रभावी अभिव्यक्ती आणि आत्मविश्वासपूर्ण आविष्कार यांच्या जोरावर विवेकानंद कॉलेजच्या युवा कलाकारांनी आपल्या गुणवत्तेची दमदार मोहोर उमटवली! संगीत, नाट्य आणि नृत्य विभागांसाठी प्राप्त झालेले फिरते चषक हे या उज्ज्वल यशाचे मानाचे शिलेदार ठरले आहेत. विविध कलाप्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश म्हणजे त्यांच्या प्रतिभेचा, कठोर परिश्रमांचा आणि कलासाधनेचा गौरव होय.
या युवा महोत्सवात – लोककला – प्रथम क्रमांक , एकपात्री अभिनय – प्रथम क्रमांक, प्रहसन – प्रथम क्रमांक , शास्त्रीय सुगम गायन – प्रथम क्रमांक , शास्त्रीय तबलावादन – प्रथम क्रमांक , पाश्चिमात्य एकल गायन – प्रथम क्रमांक, एकांकिका - प्रथम क्रमांक, भारतीय समुहगीत – प्रथम , शास्त्रीय सुरवाद्य – प्रथम , शास्त्रीय तालवाद्य – प्रथम, पाश्चिमात्य एकल गायन – प्रथम, पाश्चिमात्य एकल वादन - द्वितीय
याशिवाय इतर विविध स्पर्धांमध्ये द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त झालेला आहे .
महाविद्यालयास खालीलप्रमाणे ट्रॉफी प्राप्त झालेल्या आहेत.
1 ) प्रथम कुलगुरू स्व आप्पासाहेब पवार वैयक्तिक स्पर्धा फिरता चषक 2) अभिजीत दादा कदम सांघिक स्पर्धा फिरता चषक 3) सरदार बाबासाहेब माने लोककला फिरता चषक 4) संगीत विभाग फिरता चषक
5) नृत्य विभाग फिरता चषक 6) नाट्य विभाग
या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते सांस्कृतिक विभागातील या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, गेली अठरा वर्षे विवेकानंद महाविद्यालय शिवाजी विद्यापीठ युवा महोत्सवामध्ये जनरल चॅम्पियनशीप पटकावत आहे. ही संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे. विद्यार्थ्यांचे कष्ट्, तयारी , शिक्षकांचे उत्कृष्ठ मार्गदर्शन यामुळेच हे यश मिळाले आहे. युवा महोत्सवामुळे विद्यार्थ्यांना एक चांगले व्यासपीठ मिळते, कला गुणांना वाव मिळतो याचा फायदा विद्यार्थ्यानी घ्यावा, त्यामुळे अनेक कलाकार घडत आहेत. आपल्या कलागुणांनी महाविद्यालयाचा नावलौकिक उंचावणाऱ्या सर्व विद्यार्थी कलाकारांचे व विद्यार्थ्यांना योग्य दिशा देऊन त्यांच्या कलागुणांना पैलू पाडणाऱ्या सर्व प्राध्यापक, मार्गदर्शक आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन करतो.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे म्हणाले, संघाचे प्रभावी नेतृत्व, व्यवस्थापन आणि समन्वय साधत सूक्ष्म नियोजन, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमांतून हे यश मिळाले आहे , विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारी समृद्ध परंपरा, मार्गदर्शकांचे निष्ठापूर्ण योगदान आणि सर्वांच्या एकजुटीतून साकारलेले हे यश विवेकानंद कॉलेजच्या सांस्कृतिक वैभवाची साक्ष देणारे आहे. ज्ञानासोबत कला, शिक्षणासोबत संस्कार आणि गुणवत्तेसोबत सर्जनशीलता यांचा सुंदर संगम म्हणजे विवेकानंद कॉलेज! हे यश केवळ पारितोषिकांचे नाही; हे यश आहे प्रतिभेचे, परिश्रमांचे, शिस्तीचे, समर्पणाचे आणि सांघिक भावनेचे! विजयाची पताका अशीच उंच फडकत राहो अशा शुभेच्छा मी या प्रसंगी करतो.
या उज्वल यशाबद्दल सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. आरिफ महात , सदस्य् डॉ राजश्री पाटील, प्रा संदीप पाटील, डॉ.संपदा टिपकुर्ले, प्रा सतीश उपळावीकर, प्रा.एच.व्ही.चामे, संगीत शिक्षक श्री महेश हिरेमठ, सुधर्म देसाई, व प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेचे सीईओ मा.कौस्तुभ गावडे , विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ मिलिंद हुजरे, डॉ. सी. बी. पाटील, डॉ. एकनाथ आळवेकर, श्री हितेंद्र साळुंखे, रजिस्ट्रार श्री एस के धनवडे, अधीक्षक श्री.एस.पी.दळवी, श्री सदानंद दुर्गुळे, श्री बबन करपे यांनी अभिनंदन व कौतुक केले.
शिवाजी विद्यापीठ युवा महोत्सवात सलग 18 वर्षे विवेकानंद कॉलेज अव्वल
|