बातम्या

मोरजाई पठारावर विवेकानंद कॉलेजचा पर्यावरणपूरक उपक्रम

Vivekananda Colleges eco friendly initiative on Morjai plateau


By nisha patil - 11/18/2025 3:46:11 PM
Share This News:



मोरजाई पठारावर विवेकानंद कॉलेजचा पर्यावरणपूरक उपक्रम
 

जैवविविधता अभ्यासासोबत प्लास्टिक कचरा संकलन मोहिम

कोल्हापूर, दि. 18 : विवेकानंद ज्युनिअर कॉलेजच्या आर्ट्स–कॉमर्स विभागामार्फत ‘पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा’ या विषयाअंतर्गत मोरजाई पठार, गगनबावडा येथे जैवविविधता अभ्यास व प्लास्टिक कचरा संकलन हा उपक्रम राबविण्यात आला. सह्याद्री पर्वतरांगेतील हे जैवविविधतेने समृद्ध पठार दरवर्षी हजारो पर्यटकांना आकर्षित करते. वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे येथे प्लास्टिक कचर्‍याचे प्रमाण चिंताजनक झाले असून विद्यार्थ्यांनी यात प्रदूषण नियंत्रणासाठी मोलाचे योगदान दिले.

उपक्रमामध्ये इयत्ता ११ वी आर्ट्स व कॉमर्सच्या ४१ विद्यार्थ्यांनी, तसेच शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. पर्यावरण विषय शिक्षक अनिल धस यांनी जैवविविधतेची वैशिष्ट्ये, त्याचे पर्यावरणीय महत्त्व आणि वाढते धोके याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पठारावर भटकंती करून वनस्पती, प्राणी, पक्षी व किटक यांचा प्रत्यक्ष अभ्यास केला. नैसर्गिक अधिवास, पर्यावरणीय धोके व निरीक्षणांची नोंदही विद्यार्थ्यांनी केली.

परिसरातील वाढत्या प्लास्टिक प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी विद्यार्थ्यांना १० गटांमध्ये विभाजित करून प्लास्टिक संकलनाची जबाबदारी देण्यात आली. प्रत्येक गटाला एक मोठी पिशवी देण्यात आली व निश्चित मार्गदर्शनानुसार संकलन मोहीम हाती घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी सुमारे ३० किलो प्लास्टिक कचरा गोळा केला. यात पाण्याच्या बाटल्या, अन्नपदार्थांचे रॅपर्स, कॅरी बॅग्ज, पेले, चपला इत्यादींचा समावेश होता.

या उपक्रमाचे आयोजन विभागप्रमुख प्रा. सौ. शिल्पा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. उपक्रम यशस्वी करण्यात पी. वाय. राठोड, प्रा. सौ. एस. एन. ढगे, प्रा. सौ. शुभांगी पाटील, ए. आर. धस व संतोष कोले यांनी सहभाग नोंदविला. तसेच स्टाफ सेक्रेटरी  बी. एस. कोळी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही विशेष सहकार्य केले.

विद्यार्थ्यांनी घेतलेली पर्यावरणाबद्दलची ही पुढाकारवृत्ती समाजासाठी प्रेरणादायी ठरली.


मोरजाई पठारावर विवेकानंद कॉलेजचा पर्यावरणपूरक उपक्रम
Total Views: 58