शैक्षणिक
विवेकानंद कॉलेजचे विशेष श्रमसंस्कार शिबीर पाडळी बुद्रुक येथे सुरु
By Administrator - 1/20/2026 4:39:38 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजचे विशेष श्रमसंस्कार शिबीर पाडळी बुद्रुक येथे सुरु
कोल्हापूर दि. 20 : विवेकानंद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर पाडळी बुद्रुक ता. करवीर येथे सुरू झाले आहे. सदरचे शिबीर 23 जानेवारी 2026 पर्यंत सुरु राहणार आहे. या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन डॉ. टी. एम. चौगुले संचालक राष्ट्रीय सेवा योजना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या हस्ते झाले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून युवकांना समाजाच्या समस्या व गरजा समजावून घेण्यास मदत होते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, संभाषण कौशल्य, स्वावलंबन इत्यादी गुण विकसित होतात, असे मत त्यांनी उद्घाटन प्रसंगी मांडले.
या शिबीरात ग्रामसफाई, आरोग्य शिबीर, वृक्षसंवर्धन, एड्स जनजागृती, जलसाक्षरता, महिला सबलीकरण, पर्यावरण जागृती, सांडपाणी व्यवस्थापन, प्रदुषण व पर्यावरण जनजागृती इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या शिबीरामध्ये मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात आली असून जलसंधारण व शाश्वत विकासामध्ये युवकांचा सहभाग हे ब्रीदवाक्य विचारात घेऊन हे शिबीर संपन्न होत आहे.
यावेळी पाडळी गावचे सरपंच श्री शिवाजी गायकवाड यांनी एन. एस. एस. विद्यार्थ्यांनी गावातील लोकांचे स्वच्छतेविषयी व मोबाईलच्या अतिवापराबद्दल प्रबोधन करावे, असे आवाहन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी थोरात यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी शारीरिक कष्टासोबत अभ्यासातील एकाग्रता वाढवणे गरजेचे आहे. समाजमाध्यमांचा वापर जाणिवपूर्वक करा, जीवनात यशस्वी होण्यासाठी बैठक व एकाग्रता आवश्यक आहे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ संदीप पाटील कार्यक्रमाधिकारी राष्ट्रीय सेवा योजना यांनी केले. याप्रसंगी गावातील धनाजी पाटील उपसरपंच, संदीप पाटील, अरुणा पाटील आणि राजू पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री हेमंत पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. सूत्रसंचालन डॉ राजश्री पाटील यांनी केले. यावेळी उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ तसेच महाविद्यालयातील डॉ. पी आर बागडे, , डॉ बी टी दांगट, सौ एम के पोवार, सौ एल आर कुटिन्हो हे शिक्षक व कार्यक्रम अधिकारी, एन.एस.एस. स्वयंसेवक उपस्थित होते.
विवेकानंद कॉलेजचे विशेष श्रमसंस्कार शिबीर पाडळी बुद्रुक येथे सुरु
|