बातम्या
व्यंकटराव शिक्षण संकुलात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
By nisha patil - 6/26/2026 3:01:41 PM
Share This News:
**व्यंकटराव शिक्षण संकुलात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी**
**आजरा (हसन तकीलदार)**:-येथील व्यंकटराव शिक्षण संकुलामध्ये सामाजिक सुधारणांचे प्रणेते आणि प्रजाहितदक्ष लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे संचालक सुधीर जाधव, सचिन शिंपी व पांडुरंग जाधव यांच्या हस्ते सन्मानपूर्वक करण्यात आले.
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेचे संचालक पांडुरंग जाधव म्हणाले की,"राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे एक आदर्श राज्यकर्ते आणि सामाजिक सुधारणांचे अग्रदूत होते. त्यांनी समता, सामाजिक न्याय, शिक्षणाचा प्रसार आणि सर्वसमावेशक विकास या मूल्यांचा पुरस्कार करत समाजपरिवर्तनाचा नवा आदर्श घालून दिला. वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले कार्य आजही संपूर्ण समाजासाठी दिशादर्शक व मार्गदर्शक आहेत. त्यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपत आपण सर्वांनी समतामूलक व सक्षम भारताच्या निर्मितीसाठी कटिबद्ध राहिले पाहिजे."
त्यानंतर प्राचार्य एस. एन. पाटील यांनी शाहू महाराजांच्या क्रांतिकारी कार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले, "शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने दृष्ट्ये राजे होते. त्यांनी १९०२ साली मागासवर्गीयांसाठी ५०% आरक्षण लागू करून सामाजिक न्यायाची मुहूर्तमेढ रोवली. 'शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही' हा मंत्र देत त्यांनी मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरू केले आणि बहुजन समाजासाठी वसतिगृहांची स्थापना केली. यासोबतच विधवा पुनर्विवाह कायदा, बालविवाह बंदी यांसारखे कायदे करून स्त्री-सक्षमीकरणाला गती दिली. कला, संगीत, नाटक आणि कुस्ती या क्षेत्रांना राजाश्रय देऊन त्यांनी केवळ कोल्हापूर संस्थानच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राला पुरोगामी विचारांची दिशा दिली."
या कार्यक्रमास संकुलाच्या पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक आर. व्ही. देसाई, जुनिअर कॉलेज विभागप्रमुख एम. ए. पाटील, शिवाजी पारळे, श्रीमती एन. ए. मोरे यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. पी. होरटे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार पी. व्ही. पाटील यांनी मानले
व्यंकटराव शिक्षण संकुलात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
|