राजकीय
लोकसहभागातून जलक्रांती जल व्यवस्थापन पंधरवडा ला नवे बळ वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
By nisha patil - 4/24/2026 11:25:06 AM
Share This News:
लोकसहभागातून जलक्रांती जल व्यवस्थापन पंधरवडा ला नवे बळ - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेला जलसंवर्धनाचा दूरदर्शी वारसा आजही तितकाच प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्यातून जलसंपत्तीचे महत्त्व आणि लोकसहभागातून शाश्वत व्यवस्थापनाची गरज अधोरेखित होते. या ऐतिहासिक परंपरेला पुढे नेत राज्य जलसमृद्ध करण्यासाठी समाजाच्या प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मत व्यक्त होत आहे.
राज्यात राबविण्यात येत असलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ या अभियानातून जलसंवर्धनाला नवे बळ मिळण्याची अपेक्षा आहे. लोकसहभाग हा या अभियानाचा केंद्रबिंदू असून, गावपातळीपासून शहरांपर्यंत जलस्रोतांचे संवर्धन, पुनर्भरण आणि योग्य व्यवस्थापन यावर भर दिला जात आहे. या उपक्रमात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून जलक्रांती घडवून आणावी, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.
कागल येथे हिरण्यकेशी आणि चिकोत्रा नद्यांच्या पाण्याचे कलशपूजन उत्साहात पार पडले. या धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमातून जलसंवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात आला. ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रा मोहिमेच्या माध्यमातून राज्यातील जलस्रोतांचे महत्त्व अधोरेखित करत जलसमृद्ध महाराष्ट्र घडविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात येत आहे.
आजच्या बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर जलव्यवस्थापन हा केवळ प्रशासनाचा विषय नसून तो सामाजिक चळवळ बनणे आवश्यक आहे. अहिल्यादेवींच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जलसंधारणाच्या दिशेने प्रत्येकाने पाऊल उचलले, तर भविष्यातील पाणीटंचाईवर मात करणे शक्य होईल.
लोकसहभागातून जलक्रांती जल व्यवस्थापन पंधरवडा ला नवे बळ वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
|