राजकीय
जनतेला आम्ही सक्षम पर्याय उपलब्ध करून देत आहोत -आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती
By nisha patil - 11/19/2025 1:16:32 PM
Share This News:
आजरा(हसन तकीलदार):-आजरा नगरपंचायतीच्या रणधुमाळीत आघाड्यांची रचना करताना दमछाक होताना दिसून येत आहे. विरोधी आघाडीमध्ये सक्षम नेतृत्वाचा अभाव असल्याने जोडण्या करताना अनंत अडचणी येत आहेत. वेळेत आणि योग्य निर्णयाआभावी काहींनी सवतेसुभे करीत तिसऱ्या आघाडीची घोषणा केली आहे. अशोक अण्णांना निर्णय घेण्याचा अधिकार असल्याने तसेच एकहाती नेतृत्व असल्याने त्यांनी परवाच ताराराणी आघाडीच्या नगराध्यक्ष पदासह सतरा वॉर्डातील उमेदवारही जाहीर केले आहे. परंतु विरोधी आघाडीचे बास्तान अजून बसलेले नाही. उमेदवारीच्या अट्टाहासापायी आणि विचार न जुळल्यामुळे आता तिसऱ्या आघाडीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आजरा अन्याय निवारण समितीने पत्रकार परिषद घेऊन नगरध्यक्ष पदाच्या उमेदवाराचीही घोषणा केली आहे.
अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले, वैद्यकीय क्षेत्रात आपल्या प्रामाणिक सेवेचा ठसा उमटवलेले, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांची जाण असलेले,, लेखक,उत्कृष्ट नाटककार डॉ. श्रद्धानंद ठाकूर यांना नागराध्यक्ष पदाची धुरा देऊन निष्कलंक, स्वच्छ तसेच समविचारी उमेदवार घेऊन एक सक्षम आघाडी स्थापन करून जनतेला पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्धार आजरा अन्याय निवारण समितीने पत्रकार परिषदेत घेतला आहे.
अशोकअण्णांना रोखण्यासाठी विरोधकांनी मोट बांधत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, बीजेपीचा जुना नाराज गट, शिवसेना उबाठा, मुस्लिम युवा गट तसेच आजरा अन्याय निवारण समिती एकत्र येत आघाडी करण्याचा प्रयत्न झाला. परंतु पक्षनिष्ठा असलेले, पक्षाशी प्रामाणिक राहिलेल्या कार्यकर्त्यावर अन्याय होऊ लागल्याचे जाणवताच काहींनी नाराजी व्यक्त करीत आपला सवतासुभा मांडला आणि पत्रकार परिषद घेत समविचारी मंडळींसोबत स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार असून तसा निर्णय आघाडी व समविचारी मंडळींनी बोलून दाखवला. यावेळी डॉ. श्रद्धानंद ठाकूर म्हणाले की, आम्ही सत्तेसाठी नव्हे तर जनतेच्या आग्रहास्तव निवडणूकीच्या रिंगणात आलो आहोत. घराणेशाही आणि भ्रष्टाचारमुक्त नगरपंचायत करण्यासाठी रिंगणात आहोत. पैशाच्या जोरावर निवडणुका होणार परंतु आम्ही जनतेच्या भरवशावर आणि पाठिंब्यावर निवडणूक लढवणार आहोत.
भाजपचे जुने निष्ठावंत अरुण देसाई म्हणाले की, सत्ताधाऱ्यांनी निधी आणला म्हणून वल्गना करीत आहेत. परंतु निधी हा शासनाकडून येतो त्यामुळे तो आम्ही आणला हा कांगावा करू नये. निधी आणला परंतु निधीचा सदुपयोग होणे गरजेचे आहे. जनतेच्या मूलभूत प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न झाला आहे. 27कोटींच्या पाणी योजनेची अवस्था जनता डोळ्यांनी बघत आहेत त्यामुळे याविषयी आणखीन काही सांगण्याची गरज नाही. मुदत संपूनही अडीच वर्षे काम सुरु आहे. नियोजनशून्य कामामुळे जनता त्रस्त आहे. मागील अडीच तीन वर्षापासून जनतेच्या मूलभूत गरजा आणि समस्यासाठी अन्याय निवारण समिती लढा देत आहे आंदोलने केली मात्र एकही नगरसेवक यावेळी प्रशासनाला जाब विचारायला भाग घेतला नाही.
अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे म्हणाले की, शहराच्या विकासासाठी चांगल्या उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. उमेदवारांच्यामध्ये खास वैशिष्ठे आहेत. सुशिक्षित, दूरदृष्टी, निःस्वार्थपणे काम करणारे, चारित्र्यवान, स्वच्छ व्यवहाराद्वारे जनतेचा विश्वास जपणारे, अतिरिक्त संस्थांचा कोणताही भार नसलेले जनतेसाठी पूर्णवेळ देणारे उमेदवार आम्ही रिंगणात उतरवून जनतेला एक सक्षम आणि योग्य पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचबरोबर प्रा. सुधीर मुंज यांनीही आपले मत व्यक्त करीत आघाडीची दिशा मांडली. यावेळी सुधीर(बापू), कुंभार, दयानंद भुसारी, राजेंद्र चंदनवाले, गौरव देशपांडे, नाथा देसाई, जावेदभाई पठाण, पांडुरंग सावरतकर, जोतिबा आजगेकर, मिनिन डिसोझा, हर्षद परुळेकर यांच्यासह समविचारी व अन्यायग्रस्त कार्यकर्ते उपस्थित होते.
जनतेला आम्ही सक्षम पर्याय उपलब्ध करून देत आहोत -आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती
|