ताज्या बातम्या
सोनम वांगचुक यांच्या सुटकेसाठी “आम्ही भारतीय लोक आंदोलन”ची मागणी
By nisha patil - 6/10/2025 4:13:18 PM
Share This News:
सोनम वांगचुक यांच्या सुटकेसाठी “आम्ही भारतीय लोक आंदोलन”ची मागणी
केंद्र सरकारच्या हुकूमशाहीविरोधात देशभर निषेधाची लाट
कोल्हापूर │ “आम्ही भारतीय लोक आंदोलन”च्या वतीने आज (दि. ६ ऑक्टोबर २०२५) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ञ व पर्यावरण तज्ञ डॉ. सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करावी व लेह-लडाखच्या नागरिकांच्या न्याय्य मागण्या मान्य कराव्यात, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, २६ सप्टेंबर रोजी केंद्र सरकारने वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) अंतर्गत अटक केली असून, त्यांना जोधपूर तुरुंगात ठेवण्यात आले आहे. अटकेनंतर त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होऊ शकलेला नाही, तसेच लडाखमध्ये कर्फ्यू व इंटरनेट बंदी लागू करण्यात आली आहे. या कृतींना हुकूमशाही प्रवृत्तीचे आणि संविधानविरोधी ठरवत आंदोलनकर्त्यांनी निषेध व्यक्त केला आहे.
वांगचुक यांनी शिक्षण, पर्यावरण आणि विज्ञान क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे भारताचे नाव जगभर पोहोचले आहे. त्यांनी भारतीय सैनिकांसाठी आधुनिक तंबू निर्माण केले, तसेच अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली लडाखमध्ये राज्याचा दर्जा, ६व्या अनुसूचीची अंमलबजावणी, लोकसेवा आयोगाची स्थापना आणि अजून एक संसदीय जागा वाढवणे या मागण्यांसाठी शांततापूर्ण आंदोलन सुरू होते.
मात्र, केंद्र सरकारने या आंदोलनाला दडपण्यासाठी गोळीबार केला, ज्यात चार आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला व शेकडो जखमी झाले. या घटनेची सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
“भारतीय कम्युनिस्ट पक्ष व पुरोगामी संघटना संविधान आणि लोकशाही मूल्यांच्या बाजूने ठाम आहेत. केंद्र सरकारने तात्काळ सोनम वांगचुक यांची सुटका करावी, अन्यथा देशभर जनआंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
या वेळी खी. जाधव, स्वप्निल मुळे, शुभम शिरारी, करण कवठेकर, किरण कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सोनम वांगचुक यांच्या सुटकेसाठी “आम्ही भारतीय लोक आंदोलन”ची मागणी
|