राजकीय

कोण आरोग्यमंत्री? कसला फोन?

Who is the Health Minister


By nisha patil - 3/12/2025 11:55:55 AM
Share This News:



आजरा (हसन तकीलदार):
“आरोग्यमंत्री कोण? कसला फोन?” — अशा उद्धट आणि अहंमन्य वागणुकीने गडहिंग्लज नगरपालिकेच्या विवाह नोंदणी कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने नागरिकांना काल प्रचंड त्रास दिला. विवाह नोंदणी प्रक्रिया जाणीवपूर्वक लांबवण्याचा त्याचा प्रयत्न अखेर पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर फसला.

आजरा येथील एका गृहस्थाच्या मुलाचा विवाह जूनमध्ये पार पडला होता. त्याची नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव गडहिंग्लज विवाह नोंदणी कार्यालयात दाखल करण्यात आला. दिनांक १ डिसेंबर रोजी नोंदणीची अधिकृत प्रक्रिया पूर्ण व्हावी म्हणून मुहूर्त मिळाला होता. मात्र, दरम्यानच्या काळात कर्मचारी श्री. परीट हे सुटीवर असल्याचे किंवा अधीक्षक अधिकारी खोत उपलब्ध नसल्याचे कारण देत ही प्रक्रिया वारंवार टाळली जात होती.

सोमवारच्या मुहूर्तावर सर्व साक्षीदारांना कार्यालयात आणल्यानंतर अधीक्षक खोत “दोन वाजता जेवायला जातील” अशी माहिती देण्यात आली. आधीच लांबणीवर गेलेल्या प्रक्रियेमुळे साक्षीदार कसे थांबतील याची चिंता होताच, संबंधित पालकांनी जिल्ह्याचे पालकमंत्री व आरोग्यमंत्री आबिटकर यांच्याशी संपर्क साधला.

यावेळी फोनवरून कार्यवाही गतीने होईल अशी अपेक्षा असताना, कर्मचारी परीट यांनीच “कोण आरोग्यमंत्री? कसला फोन?” अशी उद्धट विचारणा करून वादाला तोंड फोडले. त्यानंतर त्यांनी लगेचच अधीक्षक खोत यांच्या दालनात जाऊन “ते आता साडेचारला उपलब्ध होतील” असा नवीन जाहीरनामाच काढला.

मात्र हा प्रकार पालकमंत्र्यांच्या स्वीयसहायकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ अधीक्षक चंद्रकांत खोत यांना कॉन्फरन्स कॉलवर घेऊन परिस्थितीची जाबजबाब घेतली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच जादूच्या कांडीसारखी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि विवाह नोंदणी कागदपत्रांवर सही करण्यात आली.

या संपूर्ण प्रकरणामुळे उपस्थित नागरिकांमध्ये संताप व्यक्त झाला. अशा प्रकारचे उद्धट, हीन आणि असंवेदनशील वर्तन करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांनी व्यक्त केली आहे.


कोण आरोग्यमंत्री? कसला फोन?
Total Views: 31