बातम्या
रानभाजी महोत्सवाचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्घाटन
By nisha patil - 9/18/2025 5:45:01 PM
Share This News:
रानभाजी महोत्सवाचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्घाटन
कोल्हापूर, दि. 18 : कोल्हापूरच्या कृषी संस्कृतीला आणि पारंपरिक खाद्यपदार्थांना उजाळा देण्यासाठी आत्मा (कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा), कृषी विभाग आणि उमेद-जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे उदघाटन शुक्रवार, दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत व्ही. टी. पाटील सभागृह, राजारामपुरी येथे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार आहे.
पाककला स्पर्धेत महिला सहभागी होणार
या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे महिलांचा मोठा सहभाग राहणार आहे. जिल्ह्यातील 100 हून अधिक महिला या महोत्सवातील पाककला स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या महिला विविध प्रकारच्या रानभाज्यांपासून बनवलेले चविष्ट आणि आरोग्यदायी पदार्थ सादर करणार आहेत. या महोत्सवात भाकरी आणि रानभाज्यांपासून बनवलेले खास पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध असतील. त्यामुळे नागरिकांना अस्सल ग्रामीण चवीचा अनुभव घेता येईल.
शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
या महोत्सवात 40 पेक्षा अधिक प्रजातींच्या रानभाज्यांचे प्रदर्शन करण्यात येणार असून 300 पेक्षा अधिक महिला रानभाज्यांची मांडणी करणार आहेत. याअनुषंगाने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्यामुळे तरुण पिढीला रानभाज्यांचे महत्त्व, त्यांचे औषधी गुणधर्म आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीची ओळख होईल. हा महोत्सव केवळ खाद्यपदार्थाचा नसून तो निसर्गाच्या देणगीची ओळख करुन देणारा एक ज्ञानवर्धक कार्यक्रम आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी, विशेषतः महिला, विद्यार्थी आणि खाद्यप्रेमींनी या महोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहून रानभाज्यांचे महत्त्व जाणून घ्यावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
रानभाजी महोत्सवाचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्घाटन
|