बातम्या
कोल्हापूरात ४ व ५ ऑक्टोबरला रानभाज्या व सेंद्रिय उत्पादन महोत्सव
By nisha patil - 9/30/2025 1:47:16 PM
Share This News:
कोल्हापूरात ४ व ५ ऑक्टोबरला रानभाज्या व सेंद्रिय उत्पादन महोत्सव
कोल्हापूर : एनजीओ कंपॅशन २४, कोल्हापूर वुई केअर, निसर्ग अंकुर संस्था, इकोस्वास्थ आणि किर्लोस्कर आईल इंजिन्स यांच्या वतीने ४ आणि ५ ऑक्टोबर रोजी "रानभाज्या आणि सेंद्रिय उत्पादन महोत्सव"ाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री महालक्ष्मी सांस्कृतिक भवन, साईक्स एक्सटेंशन टाकाळा, कोल्हापूर येथे सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत हा उपक्रम पार पडणार असून प्रवेश विनामूल्य आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक व माजी खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला विभागीय कृषी केंद्र सहसंचालक बसवराज मास्तोळी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, शिवाजी विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभाग प्रमुख प्रा. डॉ. ज्योती जाधव, तसेच मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे उपस्थित राहणार आहेत.
या प्रदर्शनात जवळपास २०० हून अधिक रानभाज्या व सेंद्रिय उत्पादनांचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. गारंबीची ४ फुटी शेंग, टेटूची तलवारीसारखी शेंग, खाजकुहीलीचा वेल, सोनार वेल, चन्नी, खडक अंबाडी, गिरजाला, समुद्रशोक, जैताळू यांसह अनेक दुर्मिळ रानभाज्या याठिकाणी पाहायला मिळतील. तसेच करटोली, दिंडा, बांबू कोंब, सुरण, मटारु, टाकळा, भुई आवळी अशा आरोग्यदायी व औषधी गुणांनी समृद्ध भाज्यांचेही दर्शन होणार आहे.
एकूण ३५ स्टॉल्सद्वारे सेंद्रिय गूळ, मध, धान्य, हर्बल औषधं, ऑर्गॅनिक उत्पादने, कंपोस्ट व गांडूळ खत, डीहायड्रेटेड भाजी पावडर, तसेच सेंद्रिय भाजीपाल्याचे रोपे व बी-बियाणे उपलब्ध असणार आहेत. यावेळी खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही असतील.
या प्रदर्शनाचे खास आकर्षण म्हणजे ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आलेली "रानभाज्या पाककृती स्पर्धा" (ग्रामीण व शहरी विभाग). विजेत्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र मिळणार आहे. इच्छुकांनी त्वरित संपर्क साधून नावनोंदणी करावी :
📞 सौ. मंजिरी कपडेकर – ९३७३३१९४९५
📞 ऐश्वर्या जामसंडेकर – ७६२०६१९४५५
कार्यक्रमाचे आयोजन डॉ. मधुकर बाचुळकर यांच्या निसर्ग अंकुर संस्थेच्या सहकार्याने करण्यात आले आहे. यामध्ये रानभाज्यांचे माहितीपूर्ण प्रदर्शन, पाककृती प्रात्यक्षिके, स्पर्धा आणि खाद्य महोत्सव होणार आहेत.
एनजीओ कंपॅशन २४ आणि कोल्हापूर वुई केअरचे अध्यक्ष मिलिंद धोंड यांनी आवाहन केले आहे की, विद्यार्थी, महिला, शेतकरी आणि नागरिकांनी आरोग्यदायी रानभाज्या व सेंद्रिय उत्पादनांविषयी माहिती घेण्यासाठी आणि त्यांचा आहारात समावेश करण्यासाठी या महोत्सवाला अवश्य भेट द्यावी.
कोल्हापूरात ४ व ५ ऑक्टोबरला रानभाज्या व सेंद्रिय उत्पादन महोत्सव
|