बातम्या
नवलेवाडी येथे रानडुक्कर मांस विक्री प्रकरण; चार आरोपींना तीन दिवसांची वनकोठडी
By Administrator - 5/3/2026 12:58:19 PM
Share This News:
नवलेवाडी येथे रानडुक्कर मांस विक्री प्रकरण; चार आरोपींना तीन दिवसांची वनकोठडी
वन विभागाची कारवाई; मांस, कोयता, सत्तूर, वजनकाटा आणि दोन दुचाकी जप्त
पन्हाळा वनपरिक्षेत्र व करवीर (प्रादेशिक) वनपरिक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांची संयुक्त गस्त सुरू असताना नवलेवाडी येथे रानडुक्कराच्या (Wild Boar / Sus scrofa) मांसाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार वन विभागाच्या पथकाने छापा टाकला असता श्री. विनायक संभाजी वैद्य यांच्या शेडमध्ये रानडुक्कर जाळ्यात अडकवून कोयता व सत्तूरच्या सहाय्याने मांसाचे वाटे करून विक्री सुरू असल्याचे आढळून आले.
या कारवाईत भिवाजी उर्फ सरदार संभाजी पाटील (रा. वाकरे, ता. करवीर), रतन हिंदुराव नवलव (रा. वाघुडे, ता. पन्हाळा), विनायक संभाजी वैद्य (रा. वाघुडे पैकी नवलेवाडी, ता. पन्हाळा) आणि रमेश पांडुरंग पाटील (रा. वाघुडे, ता. पन्हाळा) यांना रानडुक्कराच्या मांसासह ताब्यात घेण्यात आले.
कारवाईदरम्यान कोयता, सत्तूर, वजनकाटा तसेच दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. वनरक्षक पनुत्रे यांनी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या कलम २(१६), ९, ३९, ५० आणि ५१ अन्वये गुन्हा दाखल केला.
आरोपींना ४ मार्च २०२६ रोजी कळे-खेरीवडे (ता. पन्हाळा) येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची वनकोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक कोल्हापूर धैर्यशील पाटील, सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) पन्हाळा अजित माळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात परिमंडळ वनअधिकारी राजाराम रसाळ, सागर पटकारे, रुपाली बुचडे तसेच वनरक्षक पनुत्रे, अश्विनी मदने, अमर माने, बाजीराव देसाई आणि संदीप पाटील यांनी सहभाग घेतला.
नवलेवाडी येथे रानडुक्कर मांस विक्री प्रकरण; चार आरोपींना तीन दिवसांची वनकोठडी
|