बातम्या

गोकुळच्या ४९२ संस्थांचे भवितव्य आज ठरणार? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Will the fate of Gokul


By nisha patil - 9/16/2026 2:53:19 PM
Share This News:



गोकुळच्या ४९२ संस्थांचे भवितव्य आज ठरणार? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

 

गोकुळच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच आता ४९२ दूध संस्थांच्या पात्रतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची धामधूम सुरू असतानाच, या ४९२ संस्थांना पात्र ठरविण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे... आणि याच प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

त्यामुळे आजच्या सुनावणीकडे केवळ गोकुळच्या इच्छुक उमेदवारांचंच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राचं लक्ष लागलं आहे. सहाय्यक निबंधक दुग्ध, कोल्हापूर यांनी अवसायनात काढलेल्या संस्थांपैकी १९४ दूध संस्था उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये पात्र ठरल्या. तर आणखी २९८ दूध संस्था जिल्हा उपनिबंधक, दुग्ध, पुणे यांच्याकडे झालेल्या सुनावणीत पात्र ठरल्या. म्हणजेच... १९४ आणि २९८ अशा एकूण ४९२ संस्था पात्र ठरल्या आहेत. पण याच पात्रतेला आता इस्पुर्ली येथील श्रीराम दूध संस्थेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे.

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने एसएलपी दाखल करून घेतली असून, आज न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा आणि न्यायमूर्ती अलोक आराध्ये यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. ४९२ दूध संस्थांच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. अभिषेक मनु सिंघवी बाजू मांडणार आहेत, तर सरकारच्या वतीने अॅड. धर्माधिकारी युक्तिवाद करणार आहेत. या ४९२ संस्था गोकुळच्या मतदार यादीत कायम राहणार का? त्यांना पुन्हा अपात्र ठरवलं जाणार? या संस्थांच्या मतदानाबाबत स्वतंत्र निर्णय घेतला जाणार? याच प्रश्नांची उत्सुकता गोकुळच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढली आहे.

विशेष म्हणजे, गोकुळमध्ये महायुतीतील राजकीय संघर्ष सुरू असतानाच ४९२ संस्थांचा हा न्यायालयीन मुद्दा निवडणुकीच्या गणितावरही चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीत नेमकं काय होतं...४९२ संस्थांच्या पात्रतेबाबत न्यायालय काय भूमिका घेतं...याकडे आता संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.


गोकुळच्या ४९२ संस्थांचे भवितव्य आज ठरणार? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Total Views: 17