बातम्या
*गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची रात्र जागु लागली
By nisha patil - 10/9/2026 7:23:12 PM
Share This News:
*गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची रात्र जागु लागली
*आजरा(हसन तकीलदार):-गणपती उत्सव जसजसा जवळ येईल तसतसे कुंभारगल्लीमध्ये मूर्तिना अंतिम रूप देण्यासाठी मूर्तिकारांची रात्र जागु लागली आहे. बाप्पांच्या आगमनाचे दिवस अतिशय जवळ आल्यामुळे वेळेत मूर्ती पूर्ण करण्याचे मोठे आव्हान कलाकारांसमोर आहे. त्यामुळे कुंभारगल्लीत सध्या अहोरात्र काम सुरु असल्याचे चित्र पाहावायास मिळत आहे.
गणेश चतुर्थी अगदी तोंडावर आली असल्याने मूर्तीचे रंगकाम, डोळे रेखणे आणि दागिने सजवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे सर्व काम वेळेत पूर्ण करण्यासाठी मूर्तिकार आणि त्यांचे कुटुंबीय रात्रीचा दिवस करीत आहेत. यावेळी बोलताना सिद्धेश्वर शंकर कुंभार म्हणाले की, हा आमचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. गणेश भक्तांच्या मागणी नुसार आणि बदलत्या काळात बदलत्या आवडीनुसार आम्हाला मूर्ती तयार कराव्या लागतात.
नोकरी संभाळीत मी आज हा व्यवसाय करीत आहे. पुणे येथे नोकरी करीत आजऱ्यात हा व्यवसाय सांभाळत आहे. या अगोदर माझे वडील शंकर (बंडा)कुंभार हे ही कारखान्यात नोकरी करीत हा व्यवसाय सांभाळला होता. आज त्यांना मदत करण्यासाठी मी ही रजा टाकून आजऱ्याला आलो आहे. डायमंडच्या दागिन्यांची भक्ताकडून जास्त मागणी असल्याने ते दागिने आम्ही स्वतः घरात तयार करून मूर्ती सजवत आहोत. डायमंडच्या दागिन्यांचा बाजारात दर जास्त असल्याने आम्ही बाजारातून कच्चा माल आणून घरातच दागिने तयार करीत आहोत. भक्तांची मागणी असल्यामुळे हे दागिने तयार करण्यासाठी मी खास येथे आलो आहे.
दरवर्षी नवनवीन पद्धतीची कलाकृती वापरून मुर्त्या तयार कराव्या लागतात आणि लोकांची मने जिंकावी लागतात. महागाईमुळे व्यवसाय करताना तारेवरची कसरत करावी लागते परंतु भक्तांची मागणी आणि बाप्पांचा आशीर्वाद यामुळेच आम्ही आजही आमचा हा वडिलोपार्जित व्यवसाय जपला आहे. एक प्रकारची सेवा आमच्या हातून घडत असते. लोकांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे. असे सिद्धेश्वर कुंभार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
*गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची रात्र जागु लागली
|