बातम्या
प्रा.सुधाकर मानकर सरांच्या निधनाने उच्च शिक्षणातील नेता,सल्लागार, मार्गदर्शक, लेखक व दीपस्तंभ हरपला
By nisha patil - 5/21/2026 5:04:35 PM
Share This News:
प्रा.सुधाकर मानकर सरांच्या निधनाने उच्च शिक्षणातील नेता,सल्लागार, मार्गदर्शक, लेखक व दीपस्तंभ हरपला
कोल्हापूर : प्रा.सुधाकर सदाशिवराव मानकर सर यांच्या निधनाने प्राध्यापक संघटनेचा ज्येष्ठ नेता, उच्च शिक्षणातील राष्ट्रीय नेतृत्व, समाजाला दिशा देणारा चांगला सल्लागार, मार्गदर्शक, लेखक व दीपस्तंभ हरपल्याची भावना देशभरातील अनेक मान्यवरांनी व्यक्त केली.
प्रा. सुधाकर मानकर सर यांच्या स्मृतीस उजाळा देण्यासाठी व त्यांच्या संघटनात्मक कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बुधवारी कोल्हापुरातील नाईट कॉलेजच्या सभागृहात सुटा च्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अखिल भारतीय प्राध्यापक महासंघाचे माजी अध्यक्ष डॉ. अशोक बर्मन (कोलकत्ता), अखिल भारतीय रिटायर टीचर्स असोसिएशनचे सचिव डॉ. जे.एन.शुक्ला, खजिनदार डॉ. सदानंद भट्टाचार्य , गुजरात स्टेटचे प्रमुख डॉ. महादेव देसाई, गुलबर्गा विद्यापीठाचे डॉ. शेरीकर, ए. आय. फुकटोच्या कॉटरली न्यूज बुलेटीनचे संपादक डॉ. आर हलेश,महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे माजी अध्यक्ष डॉ.एस.पी.लवांडे सुटाचे अध्यक्ष डॉ.आर.के.चव्हाण, सेवानिवृत्त प्राध्यापक संघटनेचे सचिव डॉ एन. के. मुलला,पीडीएफ फंडाचे सेक्रेटरी डॉ. एम.डी.गुजर, कोल्हापूर सुटाचे अध्यक्ष डॉ.आर.जी कोरबू, सातारा विभागाचे अध्यक्ष डॉ.आर.के.नीमत, सांगली विभागाचे प्रमुख डॉ.एन.ए.वरेकर, एम.एफ.रूकटोचे अध्यक्ष प्रोफेसर एस. के. मठपती, सेवानिवृत्त प्राध्यापक संघ पुणे चे अध्यक्ष प्रोफेसर मगन ताटे, कोल्हापूर सुटाचे प्रमुख प्रोफेसर आर.पी.चोपडे, शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा विभाग नियंत्रक डॉ.बी.एम.हिरडेकर, डॉ.प्रकाश कुंभार, अंकिता ठाकरे, शहाजी महाविद्यालयातील भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ.डी.एल.काशीद-पाटील, नाईट कॉलेजचे प्राचार्य डॉ. उत्तम पाटील, डॉ अरुण शिंदे, डॉ. रूपा शहा, ग्रंथपाल डॉ. पांडुरंग पाटील, सुटा पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ.आर.बी.चोपडे, डॉ.अशोक पाटील, डॉ.अनिल लारेकर यांनी मानकर सरांच्या विषयी मनोगते व्यक्त करून त्यांच्या कार्याचा आढावा घेतला व कृतज्ञता व्यक्त केली.
डॉ.अशोक बर्मन म्हणाले, प्रा. मानकर सरांनी अखिल भारतीय प्राध्यापक महासंघाच्या माध्यमातून देशभरातील उच्च शिक्षण विषयक प्रश्न सोडवण्यासाठी अखंडपणे काम केले. यूजीसी, मानव संसाधन विभाग, युनोस्को यासारख्या संस्थांमध्ये उच्च शिक्षण विषयक सल्लागार म्हणून त्यांनी महत्वाची भूमिका पार पडली. ते उत्तम नेते, मार्गदर्शक, सल्लागार होते. त्यांच्या निधनाने देश पातळीवरील एक चांगला नेता हरपला आहे.त्यांचे कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
डॉ. जे .एन.शुक्ला म्हणाले देशभरातील सेवानिवृत्त प्राध्यापकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राध्यापक मानकर यांनी शेवटपर्यंत काम केले. गेली 53 वर्षे ते उच्च शिक्षणातील विविध प्रश्नाच्या लढ्यातील अग्रणी होते.
डॉ. महादेव देसाई म्हणाले, महाराष्ट्र,गुजरातसह अनेक राज्यांमध्ये सेवानवृत्त प्राध्यापकांची मोठी संघटना त्यांनी बांधली होती. हजारो माजी प्राध्यापकांना एकत्र करून त्यांचे हे कार्य सुरू होते.
डॉ.आर .के.चव्हाण म्हणाले, गेली 53 वर्षे सुटा संघटनेमध्ये प्रा.मानकर सर निरपेक्ष भावनेने कार्य करीत राहिले. प्रत्येक प्राध्यापकाला ते आपलेसे वाटत. त्यांना योग्य सल्ला मार्गदर्शन करण्याचे काम त्यांनी निरपेक्ष भावनेने अखंडपणे केले.
डॉ.हिरडेकर सर म्हणाले, प्रा. मानकर सर म्हणजे उत्तम मार्गदर्शक, तत्त्वज्ञ , चांगले मित्र होते. त्यांच्या जाण्याने समाजाची मोठी हानी झाली आहे. एक आदर्श सच्चे नेतृत्व आपल्यातून निघून गेले आहे. प्राचार्य डॉ.उत्तम पाटील म्हणाले, प्रा. मानकर सरांच्या अनेक संदर्भ ग्रंथांचा अनेक प्राध्यापक, प्राचार्य, शिक्षणातील अधिकारी, पदाधिकारी यांना उपयोग झाला आहे. अनेक प्राचार्यांचे ते मार्गदर्शक गुरु होते .
डॉ.डी.एल.काशीद-पाटील म्हणाले ,प्रा.मानकर सरांनी शेकडो माणसं उभा केली. त्याप्रमाणे घरही उभा केल. घरातील मुले,मुली, सुना,जावई यांना योग्य दिशादर्शन आणि मार्गदर्शन केले. नातवंडांना पुरेसा वेळ देऊन त्यांनी आनंद घेतला. वयाच्या 79 वर्षापर्यंतही त्यांचे आरोग्य अतिशय ठणठणीत होते. कोणतीही गोळी नाही. आपला त्रास कुणालाही न देता ते आपल्यातून निघून गेले. त्यांनी केलेले प्रामाणिक कार्य आपण पुढे नेऊया.
ग्रंथपाल डॉ. पांडुरंग पाटील यांनी मानकर सरांनी 215 हून अधिक पुस्तके लिहल्याचे सांगितले. या संदर्भ ग्रंथांमुळे महाराष्ट्रातील अनेक ग्रंथालय समृद्ध झाली आहेत. ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालकांच्या समकक्षतेचा प्रश्न त्यांनी युजीसी मार्फत जीआर काढून कायमचा सोडवून टाकला.
प्रारंभी प्रा. मानकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले दोन मिनिटे स्तब्धता राखून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
डॉ. एस ए बोजगर यांनी प्रस्ताविक केले. प्रा. अरुण शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. सुटाचे कार्यवाहक प्रा. ए.बी.पाटील यांनी आभार मानले.
यावेळी प्राचार्य डॉ. पी एन चौगुले, डॉ. अतुल मानकर प्रा. डॉ.निता काशीद- पाटील, डॉ. दीप्ती मानकर ,डॉ.एन.एस.जाधव, डॉ. प्रशांत पाटील, श्री किशोर ठाकरे, सौ.अपर्णा ठाकरे , अनेक प्राध्यापक, शिक्षक ,नागरिक तसेच सुटा संघटनेचे सभासद, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा.सुधाकर मानकर सरांच्या निधनाने उच्च शिक्षणातील नेता,सल्लागार, मार्गदर्शक, लेखक व दीपस्तंभ हरपला
|