बातम्या

इचलकरंजी एसटी स्टँडवर दागिने चोरणारी महिला जेरबंद!

Woman arrested for stealing jewelry at Ichalkaranji ST stand


By nisha patil - 11/18/2026 3:03:17 PM
Share This News:



इचलकरंजी एसटी स्टँडवर दागिने चोरणारी महिला जेरबंद!

 

इचलकरंजी एसटी स्टँडवर गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पर्समधून सोन्याचे गंठण चोरणाऱ्या रेकॉर्डवरील महिलेला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. या कारवाईत तब्बल ५ लाख ८२ हजार ९६६ रुपये किमतीचे सोन्याचे गंठण हस्तगत करण्यात आले आहे. १३ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास इचलकरंजी एसटी स्टँडवर गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या पर्समधून अंदाजे ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण चोरीला गेले होते. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तारदाळ फाटा येथे सापळा रचण्यात आला. यावेळी सपना वैभव कदम, वय ३२, रा. कुपवाड, जिल्हा सांगली हिला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिच्याकडून ४१.९४० ग्रॅम वजनाचे ५ लाख ८२ हजार ९६६ रुपये किमतीचे सोन्याचे गंठण जप्त करण्यात आले.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली असून, पुढील तपासासाठी सपना कदम हिला मुद्देमालासह शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


इचलकरंजी एसटी स्टँडवर दागिने चोरणारी महिला जेरबंद!
Total Views: 9