बातम्या
गरीब रुग्णांची सेवा हीच ईश्वरसेवा समजून प्रामाणिकपणे काम करा – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
By nisha patil - 11/20/2026 8:19:14 PM
Share This News:
गरीब रुग्णांची सेवा हीच ईश्वरसेवा समजून प्रामाणिकपणे काम करा – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
- आरोग्य विभागात नव्याने नियुक्त 263 गट-ड कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेशांचे वितरण
सांगली, दि. 20 : शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणारे गरीब व गरजू रुग्ण यांची सेवा करण्याची संधी ही ईश्वरसेवेप्रमाणेच आहे. त्यामुळे नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी रुग्णांशी संवेदनशीलतेने वागून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे. मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथे नियमित गट-ड (वर्ग-४) संवर्गातील सरळसेवा पदभरती प्रक्रियेतून अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेशांचे वितरण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास माजी मंत्री तथा आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार इद्रिस नायकवडी, आमदार सुधीर गाडगीळ, माजी खासदार संजय पाटील, समित कदम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, उपअधिष्ठाता डॉ. श्रीकांत अहंकारी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रियांका राठी, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. रूपेशकुमार शिंदे, डॉ. विकास देवकारे यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आरोग्य विभागातील गट-ड संवर्गाची भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली असून, सांगली जिल्ह्यात आरोग्य विभागात 263 उमेदवारांना शासकीय सेवेत काम करण्याची संधी मिळाली आहे. नवनियुक्त कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, सध्याच्या काळात शासकीय आणि त्यातही कायमस्वरूपी नोकरीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे ही नोकरी मिळणे ही अभिमानाची आणि जबाबदारीची बाब आहे. भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह होता. गुणवत्तेच्या आधारे पात्र उमेदवारांची निवड व्हावी, यासाठी टीसीएस, आयबीपीएस आणि एमकेसीएल या संस्थांच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेतून गुणवत्तेच्या आधारावर निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देताना समाधान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाचे सामाजिक महत्त्व ओळखून जबाबदारीने सेवा बजावावी. शासकीय रुग्णालयांमध्ये प्रामुख्याने गरीब, गरजू आणि सर्वसामान्य नागरिक उपचारासाठी येतात. अशा रुग्णांना चांगली सेवा देणे हे आपले कर्तव्य आहे. रुग्णांशी आपुलकीने व संवेदनशीलतेने वागावे.
तसेच आपल्याला घडविण्यासाठी आई-वडिलांनी घेतलेल्या कष्टांची जाणीव ठेवून त्यांच्या सेवेकडेही लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सांगली सिव्हिल हॉस्पिटलच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार इद्रिस नायकवडी आणि आमदार सुधीर गाडगीळ यांनी या रुग्णालयांमधील सोयी-सुविधा वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. शासनाचा निधी तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध विकासकामे मार्गी लागली असून, लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांमुळे रुग्णालयांच्या विकासाला गती मिळाली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
मिरज हे पूर्वीपासूनच वैद्यकीय उपचारांचे महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. येथील मिशन हॉस्पिटलची देशभरात ख्याती होती. देश-विदेशातून रुग्ण उपचारासाठी मिरज येथे येत असत. या वैद्यकीय परंपरेचे गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर आणि कर्मचारी प्रयत्नशील आहेत. रुग्णालयाच्या बळकटीकरणासाठी लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागण्यांवर सकारात्मक विचार करून त्या पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्न करेल, अशी ग्वाही देऊन मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, मिरज व सांगली येथील शासकीय रुग्णालयांमध्ये एमआरआय आणि सीटी स्कॅनसारख्या अत्याधुनिक तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देऊ. कॅथलॅब सुरू करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे त्यांनी स्पष्ट केले.
वैद्यकीय शिक्षण विभागाची जबाबदारी केवळ रुग्णांना उपचार उपलब्ध करून देण्यापुरती मर्यादित नाही, तर वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा उंचावणे हीदेखील महत्त्वाची जबाबदारी आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांना अद्ययावत उपचार मिळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, निवास व्यवस्था आणि आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणेही गरजेचे आहे. आर्थिक परिस्थितीमुळे खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणे शक्य नसलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आधार ठरत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याकडे शासन विशेष लक्ष देत असल्याचे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.
यावेळी आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार इद्रिस नायकवडी आणि आमदार सुधीर गाडगीळ यांनी मनोगत व्यक्त केले. मिरज व सांगली येथील शासकीय रुग्णालयांमध्ये आतापर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध वैद्यकीय सुविधा व विकासकामांची माहिती त्यांनी दिली. रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच, रुग्णालयांमध्ये आवश्यक असलेल्या उर्वरित सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविक वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. रूपेशकुमार शिंदे यांनी केले. ही भरती प्रक्रिया जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पारदर्शकपणे पार पाडली. या समितीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता हे सदस्य सचिव होते. कार्यक्रमास रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच नवनियुक्त कर्मचारी उपस्थित होते.
गरीब रुग्णांची सेवा हीच ईश्वरसेवा समजून प्रामाणिकपणे काम करा – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
|