शैक्षणिक
विद्यापीठात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा उत्साहात
By nisha patil - 9/15/2025 4:11:06 PM
Share This News:
विद्यापीठात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा उत्साहात
कोल्हापूर, दि. १५ सप्टेंबर: शिवाजी विद्यापीठातील यु.जी.सी. स्किम पर्सन विथ डिसॅबिलिटीज् आणि समावेशी शिक्षण संसाधन केंद्रामार्फत गेल्या शुक्रवारी (दि. १२) विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालयांमध्ये प्रवेशित दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय कार्यशाळा अत्यंत उत्साहात पार पडली.
या कार्यशाळेसाठी साधन व्यक्ती म्हणून डॉ. अभिधा धुमटकर आणि समिधा धुमटकर या उपस्थित होत्या. डॉ. धुमटकर या महाराष्ट्रातील व भारतातील पहिल्या अंध व्यक्ती आहेत, ज्यांना संशोधनासाठी लंडनची चार्झ वालेस फेलोशिप मिळाली आहे. त्यांना एकूण चौदा विदेशी भाषा अवगत आहेत.
सध्या त्या मुंबई येथील साठ्ये महाविद्यालयात इतिहास विभागाच्या प्रमुख आहेत. यावेळी त्यांनी आपले अनुभवकथन करताना आपला शैक्षणिक व संशोधनाचा प्रवास मांडला. त्यामध्ये येणाऱ्या अडचणींवर मात कशी केली, तेही सांगितले.
श्रीमती समिधा धुमटकर या देखील अंध असून त्या एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठात दूरध्वनी चालक आहेत. स्वावलंबनातून आपल्या व्यक्तीमत्त्वात कसा बदल घडवून आणता येऊ शकतो, हे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते. दिव्यांगजनांच्या मनामध्ये आत्मविश्वास पेरण्यासाठी आणि त्यासाठी त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यासाठी शिवाजी विद्यापीठ प्रतिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी केंद्राच्या समन्वयक डॉ. प्रतिभा देसाई यांनी प्रास्ताविक केले. सुप्रिया वडार यांनी सूत्रसंचालन केले, तर सतीश नवले यांनी आभार मानले. कार्यशाळेस विद्यापीठ व कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांतील संलग्नित महाविद्यालयांमधील शिक्षक, दिव्यांग विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यापीठात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा उत्साहात
|