बातम्या
शहाजी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा स्वरूप व तयारी वर कार्यशाळा संपन्न
By nisha patil - 12/8/2025 3:23:27 PM
Share This News:
शहाजी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा स्वरूप व तयारी वर कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर: स्पर्धा परीक्षा हा व्यक्तिमत्व विकासाचा एक भाग आहे.स्पर्धा परीक्षेतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे.विद्यार्थ्यांनी लोकसेवक होण्यासाठी, लोकांच्या समस्या, प्रश्न सोडवण्यासाठी आणि लोकशाही सुदृढ करण्यासाठी स्पर्धा परीक्षेतून अधिकारी व्हावे, त्यासाठीच तयारी करावी असे आवाहन स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक व सुप्रसिद्ध वक्ते जॉर्ज क्रूज यांनी केले.
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात आज कै.श्रीपतराव बोंद्रे दादा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, शिवाजी ग्रंथालय आणि आयक्यूएसीमार्फत भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस आर रंगनाथन यांच्या जयंतीदिनानिमित्त स्पर्धा परीक्षा स्वरूप व तयारी या विषयावर कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे यांचे या कार्यशाळेस मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले .महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी होते .
जॉर्ज क्रूज म्हणाले, स्पर्धा परीक्षेसाठी आठ, दहा लाख विद्यार्थी बसतात. त्यातील दहा ते पंधरा हजार विद्यार्थी गंभीरपणे तयारी करीत असतात. विद्यार्थ्यांनी केवळ वाचन ,लेखन व पाठांतर न करता प्रत्येक विषय आणि अभ्यासक्रमातील घटक समजून घेऊन चिंतन करावे. लोकशाही सुदृढ बनण्यासाठी आणि समाजा समोरचे विविध प्रश्न, लोकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी अधिकारी, कर्मचारी सरकार नेमते. त्याचे भान ठेवून या परीक्षा विद्यार्थ्यांनी द्याव्यात .
स्पर्धा परीक्षेतून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते. तो कधीही वाया जात नाही. या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिकाधिक ग्रंथालयांचा, चांगल्या संदर्भ ग्रंथाचा उपयोग करावा. तरच हमखास यश मिळते. त्यांनी यावेळी राज्यसेवा परीक्षा, बँकिंग परीक्षा, पोलीस व सैन्य दलातील परीक्षा याबाबत मार्गदर्शन केले.
स्वागत डॉ. एन. डी. काशीद-पाटील यांनी केले. प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. पांडुरंग पाटील यांनी केले. सौ. यू .यू.साळोखे, सौ. मंजिरी भोसले, सौ. अर्पणा गावडे, सुहास टिपुगडे यांनी संयोजन केले.
विद्यार्थी, प्राध्यापक प्रशासकीय सहकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते .शिवाजी ग्रंथालयाच्या वतीने यावेळी समाजसुधारक , क्रांतिकारक यांच्यावरील ग्रंथांचे प्रदर्शन संपन्न झाले.
शहाजी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा स्वरूप व तयारी वर कार्यशाळा संपन्न
|