शैक्षणिक

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या विश्वविजयानिमित्त कोल्हापुरात जल्लोष

World Cup victory


By nisha patil - 5/11/2025 1:10:38 PM
Share This News:



भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली असून, या विजयाचा आनंद कोल्हापुरात जल्लोषात साजरा करण्यात आला. उभा मारुती चौकात पद्मा राजे महिला संघटनेच्या वतीने महिलांनी फटाके फोडून, आतषबाजी करत, साखरपेर्‍या वाटत आनंदोत्सव साजरा केला. परिसरात जणू पुन्हा दिवाळीचं वातावरण निर्माण झालं होतं.

या वेळी संघटनेच्या अध्यक्षा सरीता सासने म्हणाल्या, “भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वविजेतेपद मिळवून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. भारतीय नारी सबपे भारी हे पुन्हा सिद्ध केलं आहे. या यशामुळे मुलींनाही क्रिकेटमध्ये करिअर करण्याची प्रेरणा मिळेल. सरकारने प्रत्येक शहरात मुलींसाठी स्वतंत्र क्रिकेटची मैदाने उपलब्ध करून द्यावीत,” अशी मागणी त्यांनी केली.

या आनंदसोहळ्यात संघटनेच्या सचिव आरती वाळके, कार्याध्यक्षा स्मिता हराळे, उपाध्यक्षा शर्मिला भोसले, उषा महिंद्रकर, संस्कृती वरुटे, सुवर्णा भोसले, शोभा मिठारी, पद्मा तूपारे, शशिकला गवळी, अंजली पाटील, प्रांजल सरनाईक यांच्यासह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पद्मा राजे महिला संघटनेच्या या उपक्रमामुळे कोल्हापूरात महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा हा जल्लोष विशेष ठरला.


भारतीय महिला क्रिकेट संघाच्या विश्वविजयानिमित्त कोल्हापुरात जल्लोष!
Total Views: 29