बातम्या

विद्युत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार

Yeshonchit satkar


By nisha patil - 10/6/2026 11:10:53 PM
Share This News:



* *विद्युत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार *

आजरा(हसन तकीलदार)*:- आजरा तालुक्याच्या वीजपुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला मलिग्रे येथील 33 के.व्ही. पर्यायी फिडर कार्यान्वित करण्यात आला आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून मुमेवाडी–आजरा 33 के.व्ही. लाईनमध्ये बिघाड झाल्यास आजरा शहर व परिसराला तब्बल 20 ते 24 तास अंधारात राहावे लागत होते, त्या समस्येवर योग्य तोडगा निघाला आहे.

मुमेवाडी–आजरा 33 के.व्ही. लाईनमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने वीजपुरवठा खंडित होत असे. याचा परिणाम औद्योगिक क्षेत्र, शासकीय कार्यालये तसेच व्यापारी व व्यावसायिकांवर होत होता. या गंभीर समस्येची दखल घेत अन्याय निवारण समिती व नगरसेवक यांनी पुढाकार घेत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, आजरा कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली.

यावेळी आजरा तालुका वीजबिल वसुलीत प्रथम क्रमांकावर असतानाही वीजपुरवठ्याच्या बाबतीत आजरा विभागावर अन्याय का होत आहे?अशी विचारणा करण्यात आली. तसेच इतर तालुक्यांमध्ये मुख्य लाईनमध्ये बिघाड झाल्यास पर्यायी व्यवस्था उपलब्ध असताना आजरा विभागासाठी अशी व्यवस्था का नाही? याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला.

या चर्चेदरम्यान संजय पवार ( कार्यकारी अभियंता, महावितरण विभाग गडहिंग्लज )यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. त्यावेळी आजऱ्यासाठी मलिग्रे येथे पर्यायी फिडर उपलब्ध असून काही तांत्रिक कारणांमुळे त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे सांगण्यात आले. तसेच आवश्यक कामे पूर्ण करून 15 दिवसांच्या आत फिडर कार्यान्वित करण्यात येईल, अशी ग्वाही देण्यात आली होती.

दिलेल्या आश्वासनानुसार कार्यकारी अभियंता संजय पोवार यांचे मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता कृष्णा कोळी, लाईनमन संतोष डोंगरे व ठेकेदार विघ्नहर्ता एटरप्राईजचे हेमंत पेडणेकर यांचे सुपरवायझर शंभूचे व चंद्रकांत कोरवी यांचे संपूर्ण पथकाने युद्धपातळीवर काम करत आवश्यक तांत्रिक कामे पूर्ण केली आणि मलिग्रे 33 के.व्ही. पर्यायी फिडर यशस्वीरित्या कार्यान्वित केला.

या उल्लेखनीय कार्याबद्दल अन्याय निवारण समिती तसेच आजरा नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी आज दि. 10 जून 2026 रोजी मलिग्रे सब-स्टेशनला भेट देऊन शाखा अभियंता कृष्णा कोळी व संतोष डोंगरे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

सत्कार समारंभास नगरसेवक व अध्यक्ष अन्याय निवारण समिती परशुराम बामणे (भाऊजी), नगरसेवक परेश पोतदार, माजी नगरसेवक बाळ केसरकर, माजी नगरसेवक किरण कांबळे, सामाजिक कार्यकर्ते अरिफभाई खेडेकर तसेच अन्याय निवारण समितीचे गौरव देशपांडे, पांडुरंग सावरतकर, जोतीबा आजगेकर, मिनीन डिसोझा आदींसह मलिग्रे सब-स्टेशनचा संपूर्ण कर्मचारीवर्ग उपस्थित होता.

या पर्यायी फिडरमुळे भविष्यात मुख्य लाईनमध्ये बिघाड झाल्यास आजरा शहर व परिसरातील नागरिकांना दीर्घकाळ वीजविना राहण्याची वेळ येणार नसून वीजपुरवठा अधिक सक्षम व विश्वासार्ह होण्यास मदत होणार आहे.


विद्युत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार
Total Views: 4