बातम्या
"‘दिल को दिल रहने दिया…’ स्टेटसनंतर तरुणाची पंचगंगेत उडी!
By nisha patil - 11/28/2025 3:23:33 PM
Share This News:
"‘दिल को दिल रहने दिया…’ स्टेटसनंतर तरुणाची पंचगंगेत उडी!
“मला माझ्या चारित्र्यावर अभिमान आहे. दिल को दिल रहने दिया, बाजार नहीं बनाया,” असा भावनिक स्टेटस टाकल्यानंतर कोल्हापूरातील सुमित विक्रांत तेली (३०, रा. शुक्रवार पेठ) याने शिवाजी पुलावरून पंचगंगेत उडी घेऊन जीव दिला. गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्याचा मृतदेह नदीकाठाशी सापडला आणि मित्र–नातेवाइकांमध्ये खळबळ उडाली.
रेडियम आर्ट आणि ट्रॉफी व्यवसायात नाव कमावलेला, उत्साही आणि सतत कामात रमणारा सुमित बुधवारीही दिवसभर मित्रांच्या संपर्कात होता. मात्र रात्री पावणेनऊला स्टेटस बदलल्यानंतर त्याने काही तासांतच टोकाचे पाऊल उचलले.
रात्री अकराच्या सुमारास पुलावरून उडी घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी नातेवाइकांना कळवले. अग्निशामक दल आणि करवीर पोलिसांनी शोधमोहीम राबवून मृतदेह बाहेर काढला.
सुमितने आत्महत्या का केली, याचा तपास सुरू असून त्याचे स्टेटस, कॉल डिटेल्स आणि वैयक्तिक परिस्थितीचा पोलिसांकडून तपास घेतला जात आहे.
"‘दिल को दिल रहने दिया…’ स्टेटसनंतर तरुणाची पंचगंगेत उडी!
|