बातम्या
प्रेमसंबंधातून नांदेडमध्ये तरुणाचा खून; अंत्यविधीपूर्वी प्रेयसीची हृदय पिळवटून टाकणारी कृती, आरोपी घरचेच जाळ्यात
By nisha patil - 11/30/2025 1:52:01 PM
Share This News:
नांदेड:- शहरात गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या प्रेमसंबंधातील खूनप्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. सक्षम ताटे या तरुणाची त्याच्या प्रेयसीच्या वडील आणि भावाने निर्घृण हत्या केल्याची तक्रार समोर आली आहे. जुना गंज भागात घडलेल्या या घटनेत सक्षमवर प्रथम गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यानंतर फरशीने वार करत त्याला ठार मारण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सक्षम आणि आंचल मामीलवाड यांचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, जातीभेद आणि घरचा विरोध यामुळे आंचलच्या कुटुंबीयांनी हे नाते मान्य केले नव्हते. सक्षमला आपली मुलगीपासून दूर राहण्याचा इशारा देऊनही त्यांचे संबंध कायम राहिल्याने गुरुवारी सायंकाळी सापळा रचून त्याचा खून करण्यात आला. सक्षमला फोनवरून बोलावून घेतल्यानंतर गजानन मामीलवाड, साहिल मामीलवाड यांसह त्यांच्या साथीदारांनी त्याच्यावर हल्ला चढवला. या घटनेनंतर नांदेडमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली.
दरम्यान, सक्षमच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग घडला. सक्षमची प्रेयसी आंचल मामीलवाड अंत्यविधीपूर्वी थेट त्याच्या घरी पोहोचली आणि त्याच्या पार्थिवासमोर लग्नविधीचे काही प्रतीकात्मक कर्मकांड केले. तिच्या कपाळावर सक्षमच्या नावाचे कुंकू भरत तिने “माझे वडील आणि भाऊ हरले; मरूनही माझा प्रियकर जिंकला” असे शब्द उच्चारत हंबरडा फोडला. तिने स्वतःलाही हळद-कुंकू लावले आणि सक्षमच्या पार्थिवावरही हळद लावण्यात आली. उपस्थितांना या क्षणी अश्रू अनावर झाले.
या हत्येप्रकरणी पोलिसांनी जलद कारवाई करत गजानन मामीलवाड, साहील ठाकूर, जयश्री ठाकूर, सोमाश लखे आणि वेदांत या पाच जणांना अटक केली आहे. सक्षमच्या खुनाचा कट कुटुंबीयांनी आधीच रचल्याचा आरोप आंचलने केला असून “माझ्या वडिलांना आणि भावाला कठोर शिक्षा व्हावी,” अशी मागणी तिने केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.
प्रेमसंबंधातून नांदेडमध्ये तरुणाचा खून; अंत्यविधीपूर्वी प्रेयसीची हृदय पिळवटून टाकणारी कृती, आरोपी घरचेच जाळ्यात
|