शैक्षणिक

तरुणांनी, विद्यार्थ्यांनी व्यापारात उतरावे: प्रा. सुधाकर मानकर

Young people and students should enter the business field Prof Sudhakar Mankar


By nisha patil - 4/2/2026 4:34:18 PM
Share This News:



तरुणांनी, विद्यार्थ्यांनी व्यापारात उतरावे: प्रा. सुधाकर मानकर

 शहाजी महाविद्यालयातील व्यापार मेळाव्यास मोठा प्रतिसाद

 कोल्हापूर: श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील कॉमर्स विभागाने आयोजित केलेल्या व्यापार मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळाला. तरुण आणि विद्यार्थ्यांनी व्यापार क्षेत्रात उतरावे असे आवाहन कॉमर्स विभागाचे माजी विभाग प्रमुख,  ज्येष्ठ प्राध्यापक सुधाकर मानकर यांनी केले.  दसरा चौक येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील कॉमर्स विभागाने आयोजित केलेल्या व्यापार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के. शानेदिवाण अध्यक्षस्थानी होते. 
 श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात कॉमर्स फेस्टिवल 2026 अंतर्गत विद्यार्थी व्यापार मेळावा उत्साहात संपन्न झाला.

श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, आय. क्यू. ए. सी. व कॉमर्स विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कॉमर्स फेस्टिवल 2026 अंतर्गत विद्यार्थी व्यापार मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन कॉमर्स विभागाचे माजी विभाग प्रमुख प्रा. सुधाकर मानकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. 
   कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कॉमर्स विभाग प्रमुख प्रा. संतोष कांबळे यांनी केले.      उद्घाटनप्रसंगी आपल्या मनोगतात प्रा. सुधाकर मानकर यांनी विद्यार्थ्यांनी उभारलेल्या विविध स्टॉल्सबाबत समाधान व्यक्त केले. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष विपणनाचे ज्ञान, व्यवहार कौशल्य तसेच व्यावसायिक अनुभव मिळतो, असे त्यांनी नमूद केले.
 अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी कॉमर्स विभागामार्फत पाचव्यांदा आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी व्यापार मेळाव्याबाबत समाधान व्यक्त केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना नवउद्योजक बनण्याची प्रेरणा मिळते तसेच अनेक विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे उभारत असल्याचे त्यांनी गौरवोद्गार काढले. 
    या व्यापार मेळाव्यात एकूण 70 विद्यार्थ्यांनी 21 स्टॉल्सच्या माध्यमातून सहभाग घेतला. या मेळाव्यात सुमारे 45,000 रुपयांची उलाढाल झाली. तसेच 1500 पेक्षा अधिक विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेळाव्यास भेट देऊन खरेदीचा आनंद घेतला. या प्रसंगी आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. आर. डी. मांडणीकर, प्रबंधक श्री रविंद्र भोसले, अधीक्षक श्री मनीष भोसले, आय. क्यू. ए. सी. सहसमन्वयक डॉ. ए. बी. बलुगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय महाविद्यालयातील सर्व विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, कॉमर्स विभागातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    या कार्यक्रमासाठी श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चीफ व्हॉईस पेट्रन तथा चेअरमन मा. श्री मानसिंग बोंद्रे (दादा) यांचे मौल्यवान प्रोत्साहन व मार्गदर्शन       लाभले.    
        अखिल भारतीय सेवानिवृत्त प्राध्यापक महासंघाच्या अध्यक्षपदी फेर निवड झाल्याबद्दल प्रा.सुधाकर मानकर यांचा प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण यांच्या हस्ते सत्कार यावेळी करण्यात आला.


तरुणांनी, विद्यार्थ्यांनी व्यापारात उतरावे: प्रा. सुधाकर मानकर
Total Views: 197