बातम्या
खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या; तीन वर्षांनंतर गुन्हा दाखल
By Administrator - 6/3/2026 11:45:10 AM
Share This News:
खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या; तीन वर्षांनंतर गुन्हा दाखल
पत्नीच्या प्रसूतीसाठी घेतलेल्या कर्जावरून मारहाण व जातीवाचक शिवीगाळ; आईच्या तक्रारीवरून दोन जणांना ताब्यात
पन्हाळा : पन्हाळा तालुक्यातील यवलूज येथे पत्नीच्या प्रसूतीसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेत न दिल्याने खासगी सावकाराने टेंपो ओढून नेत जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याच्या नैराश्यातून कर्जदाराने तीन वर्षांपूर्वी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मृताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पन्हाळा पोलिसांनी खासगी सावकार किरण शंकर हिरवे आणि त्याचा सहकारी आकाश दादासाहेब कोरवी यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पडळ येथील मृत पृथ्वीराज महादेव बुचडे यांनी पत्नीच्या प्रसूतीसाठी किरण हिरवे या खासगी सावकाराकडून १० टक्के व्याजदराने दोन लाख रुपये कर्ज घेतले होते. मात्र कर्जाचे हप्ते वेळेत भरता न आल्याने किरण हिरवे व आकाश कोरवी यांनी पृथ्वीराजचा टेंपो ओढून नेला. तसेच त्याला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे.
या प्रकारामुळे आलेल्या मानसिक नैराश्यातून पृथ्वीराज बुचडे यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये राहत्या घराजवळ गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्या वेळी सावकाराने टेंपो परत देण्याचे आश्वासन दिल्यामुळे कुटुंबीयांनी तक्रार केली नव्हती.
मात्र तीन वर्षे उलटूनही टेंपो परत न देणे तसेच व्याजाच्या रकमेची मागणी सुरूच ठेवल्याने अखेर मृताच्या आईने पन्हाळा पोलिसांत फिर्याद दिली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद करून त्यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या; तीन वर्षांनंतर गुन्हा दाखल
|