विशेष बातम्या
तरुणांनी ध्येय प्राप्तीसाठी स्वप्नांना प्रयत्नांची व कृतीची जोड द्यावी : डॉ.कृष्णा पाटील
By nisha patil - 8/13/2025 3:17:22 PM
Share This News:
तरुणांनी ध्येय प्राप्तीसाठी स्वप्नांना प्रयत्नांची व कृतीची जोड द्यावी : डॉ.कृष्णा पाटील
कोल्हापूर : आजच्या तरुणांनी ध्येय प्राप्तीसाठी स्वप्नांना प्रयत्नांची व कृतीची जोड दिली पाहिजे, असे प्रतिपादन दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक डॉ.कृष्णा पाटील यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील बी.ए., बी.कॉम., एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी.गणित, एम.बी.ए. (डिस्टन्स मोड) तसेच एम.कॉम., एम.एस्सी. गणित, एम.बी.ए. (ऑनलाईन मोड) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक युवा दिनानिमित्त “ज्ञान, कौशल्य आणि जबाबदारी : नवयुगातील युवकांची ओळख “ या विषयावरील आयोजित ऑनलाइन व्याख्यानात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी उपकुलसचिव व्ही.बी.शिंदे होते. यावेळी समन्वयक डॉ. चांगदेव बंडगर, सर्व अधिकारी, समन्वयक, सहा.प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. पाटील म्हणाले, प्रत्येक तरुणाने वर्तन, विचार आणि कृतीने तरुण असले पाहिजे.
तुमच्या विचारातून देशाचा इतिहास घडणार आहे. स्वप्न तरुण असली पाहिजेत. स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासाबरोबरच कुटुंब , समाज आणि देश याच्या विकासाचे स्वप्न तरुणांनी पाहिले पाहिजे. स्वप्नासाठी जिद्द बाळगली पाहिजे. आपण पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी शिक्षण आणि स्वतःवरील विश्वास ही शस्त्रे महत्वाची आहेत. यश हे मूल्य आणि परिश्रमावर अवलंबून असते.
युवक म्हणून असणारी ऊर्जा, शक्ती समाजासाठी आणि देशासाठी महत्वाची आहे. जगाला बदलण्याची शक्ती तरुणांमध्ये आहे. प्रत्येकाकडे कौशल्य, ज्ञान आणि जबाबदारी तरुणांना लाजवेल अशी असली पाहिजे. तरुणांनी आव्हानांना, संकटांना सामोरे जाताना स्वतःमध्ये कटुता येवू देता कामा नये. कुटुंब, समाज व संस्था येथील लोकांबद्दल व सहकारी यांच्या बद्दल आदर असला पाहिजे. सहकार्य, सकारात्मकता यावर आधारित तरुणाची भाषा असली पाहिजे,असे डॉ.पाटील म्हणाले.
यावेळी स्वागत व प्रास्ताविक सहा.प्राध्यापक डॉ.संजय चोपडे यांनी केले. पाहुण्याची ओळख सहा.प्राध्यापक डॉ.प्रकाश बेळीकट्टी यांनी करून दिली. सूत्रसंचालन सहा.प्राध्यापक डॉ. प्रवीण लोंढे यांनी केले तर सहा.प्राध्यापक डॉ.सचिन भोसले यांनी आभार मानले.
तरुणांनी ध्येय प्राप्तीसाठी स्वप्नांना प्रयत्नांची व कृतीची जोड द्यावी : डॉ.कृष्णा पाटील
|