बातम्या

शिवाजी विद्यापीठ परिसरातील प्राध्यापक भरतीत पारदर्शकतेसाठी युवासेनेची हेल्पलाइन सुरू

Yuva Sena helpline launched for transparency


By Administrator - 3/23/2026 2:58:10 PM
Share This News:



शिवाजी विद्यापीठ परिसरातील प्राध्यापक भरतीत पारदर्शकतेसाठी युवासेनेची हेल्पलाइन सुरू

शेंडूर प्रतिनिधी अजित बोडके कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत शिवाजी विद्यापीठ  व परिक्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र या भरती प्रक्रियेत काही ठिकाणी आर्थिक व्यवहार व गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी समोर आल्याने युवासेनेने याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे.

सुज्ञ उमेदवारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पैशांची मागणी केली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. यापूर्वीही काही महाविद्यालयांमधील भरती प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत युवासेनेने आवाज उठवला होता. काही ठिकाणी मुलाखतीपूर्वीच उमेदवारांची नावे निश्चित झाल्याचेही त्यांनी उघड केले होते.

या पार्श्वभूमीवर युवासेना ने भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आजपासून हेल्पलाइन सुरू केली आहे. उमेदवारांनी कोणाकडूनही नोकरीसाठी पैशांची मागणी होत असल्यास त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच गैरप्रकार आढळल्यास स्टिंग ऑपरेशनद्वारे संबंधित भरती प्रक्रिया उधळून लावण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

युवासेनेच्या वतीने कुलगुरू डॉ. डी. टी. गोसावी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भरती प्रक्रिया पारदर्शक ठेवावी, तसेच अर्ज भरण्याची अंतिम तारीख १० एप्रिलपर्यंत वाढवावी, अशी मागणी करण्यात आली. यावर कुलगुरूंनीही गैरप्रकारांविरोधात प्रशासन सतर्क असल्याचे सांगत, तक्रारी मिळाल्यास तत्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

युवासेनेने सुरू केलेल्या हेल्पलाइनचे क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत – 8308645252, 9921993292, 9552378983, 9049088678.

या वेळी युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शिवाजी विद्यापीठ परिसरातील प्राध्यापक भरतीत पारदर्शकतेसाठी युवासेनेची हेल्पलाइन सुरू
Total Views: 68