ताज्या बातम्या
कॅलिफोर्नियात ३० भारतीयांसह ४९९ अवैध प्रवाशांना अटक, महामार्ग सुरक्षेचा गंभीर मुद्दा
By nisha patil - 12/25/2025 12:28:41 PM
Share This News:
वॉशिंग्टन:- अमेरिकेत बेकायदेशीररीत्या वास्तव्य करून मोठ्या ट्रकिंग कंपन्यांमध्ये चालक म्हणून काम करणाऱ्या घुसखोरांविरोधात अमेरिकन सीमा शुल्क आणि सीमा सुरक्षा विभागाने (CBP) मोठी मोहीम उघडली आहे. कॅलिफोर्नियामध्ये राबवण्यात आलेल्या या विशेष कारवाईत ३० भारतीय नागरिकांसह एकूण ४९९ अवैध प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.
हे सर्व जण कमर्शियल ड्रायव्हर लायसन्स (CDL) वापरून सेमी-ट्रक चालवत होते. यामुळे अमेरिकेतील महामार्गांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाने याकडे गंभीरपणे पाहण्यास सुरुवात केली आहे.
हायवेवर तपासणी नाके, मोठा खुलासा
मिळालेल्या माहितीनुसार, २३ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत इंडियो स्टेशनच्या एजंटांनी हायवे ८६ आणि १११ वर तपासणी नाके उभारले होते. संशयास्पद वाटणाऱ्या सेमी-ट्रकची तपासणी केली असता, ४२ अवैध प्रवासी ट्रक चालवत असल्याचे आढळून आले.
यामध्ये ३० भारतीय नागरिक, तर उर्वरित चीन, रशिया, मेक्सिको, तुर्की आणि युक्रेन येथील नागरिकांचा समावेश आहे.
याशिवाय ‘ऑपरेशन हायवे सेंटिनल’ अंतर्गत राबवलेल्या दोन दिवसीय विशेष मोहिमेत आणखी ७ जणांना अटक करण्यात आली असून, त्यात ५ भारतीय नागरिक आहेत.
प्राणघातक अपघातांनंतर प्रशासन सतर्क
गेल्या काही आठवड्यांत अमेरिकेत घडलेल्या अनेक भीषण रस्ते अपघातांच्या तपासात, काही ट्रक चालकांकडे अमेरिकेत राहण्याचे वैध कागदपत्र नसल्याचे उघड झाले होते. तरीही ते मोठे सेमी-ट्रक चालवत होते.
याच पार्श्वभूमीवर कॅलिफोर्नियातील ट्रकिंग कंपन्यांना लक्ष्य करून ही मोहीम राबवण्यात आली. रस्ते सुरक्षा सुनिश्चित करणे आणि इमिग्रेशन कायद्यांचे उल्लंघन रोखणे, हे या कारवाईचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे CBP ने स्पष्ट केले आहे.
लायसन्स वाटपावर प्रश्नचिन्ह
या कारवाईदरम्यान अटक करण्यात आलेल्या व्यक्तींकडून एकूण ३९ कमर्शियल ड्रायव्हर लायसन्स जप्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, यातील ३१ लायसन्स कॅलिफोर्निया राज्यानेच जारी केले होते.
उर्वरित लायसन्स न्यूयॉर्क, न्यू जर्सी, फ्लोरिडा, वॉशिंग्टन आणि इलिनॉय या राज्यांमधून मिळवण्यात आले होते. बेकायदेशीररीत्या अमेरिकेत राहणाऱ्या व्यक्तींना हे परवाने कसे मिळाले, यावर आता मोठा वाद निर्माण झाला आहे.
राज्यांच्या धोरणांवर टीका
एल सेंट्रो सेक्टरचे कार्यवाहक मुख्य पेट्रोल एजंट जोसेफ रेमेनार यांनी या प्रकरणानंतर राज्यांच्या धोरणांवर तीव्र टीका केली आहे.
“ज्या राज्यांनी या घुसखोरांना कमर्शियल ड्रायव्हर लायसन्स दिले, ते अलीकडील प्राणघातक अपघातांना थेट जबाबदार आहेत. या व्यक्तींनी कधीही मोठे ट्रक चालवायला नको होते,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
सध्या अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर इमिग्रेशन कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाणार आहे.
कॅलिफोर्नियात ३० भारतीयांसह ४९९ अवैध प्रवाशांना अटक, महामार्ग सुरक्षेचा गंभीर मुद्दा
|