मनोरंजन

अभिनय बेर्डेचा सिनेसृष्टीला ब्रेक! अचानक घेतलेल्या निर्णयामागचं खरं कारण काय?

abhinay berde cinema break decision reason


By Shivani - 7/9/2026 5:13:00 PM
Share This News:



अभिनय बेर्डेने घेतला अभिनयातून ब्रेक; नेमकं कारण काय..? 

मुंबई :

ज्येष्ठ अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा आणि अभिनेता अभिनय बेर्डे याने गेल्या काही वर्षांत मराठी मनोरंजनसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, तब्बल 9 वर्षांच्या फिल्मी कारकिर्दीनंतर अभिनयने अभिनय क्षेत्रातून काही काळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत त्याने या निर्णयामागचं कारणही स्पष्ट केलं आहे.

अभिनय बेर्डेने 2017 मध्ये ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्याच्या पहिल्याच सिनेमाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या चित्रपटातील अनुराग ही त्याची भूमिका विशेष लोकप्रिय झाली. ‘ती सध्या काय करते’ हा चित्रपट मराठीतील लोकप्रिय आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या सिनेमांपैकी एक ठरला.

यानंतर अभिनयने ‘अशी ही आशिकी’, ‘रंपाट’, ‘मन कस्तुरी रे’, ‘बांबू’, ‘बॉइज 4’, ‘दशावतार’, ‘वडापाव’ आणि ‘उत्तर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. यापैकी ‘दशावतार’ या सिनेमातील त्याच्या कामाची विशेष चर्चा झाली.

अभिनय बेर्डेचा इंडस्ट्रीतून ब्रेक

9 वर्षांच्या फिल्मी प्रवासानंतर अभिनय बेर्डेने सध्या अभिनय क्षेत्रापासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याने आपल्या चाहत्यांना याबाबत माहिती दिली.

अभिनय म्हणाला की, “मी माझ्या करिअरपासून थोडा ब्रेक घ्यायचा ठरवलं आहे.” मात्र हा ब्रेक अभिनयाला कायमचा रामराम करण्यासाठी नसून, स्वतःचं स्टार्टअप सुरू करण्यासाठी असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे.

स्वतःचं स्टार्टअप सुरू करणार

अभिनयने सांगितलं की, तो सध्या आपल्या स्टार्टअपच्या आयडियेशन फेजमध्ये आहे. मात्र, अद्याप त्याला अंतिम व्यवसायाची कल्पना सुचलेली नाही. त्यामुळे त्याने चाहत्यांकडून आणि सोशल मीडिया फॉलोअर्सकडून नवीन कल्पना मागवल्या आहेत.

“ब्रेक यासाठी आहे की, मी स्वतःचं स्टार्टअप सुरू करणार आहे. त्यासाठी काही नवीन आयडियाज हव्या आहेत. अजून आयडिएशन फेजमध्येच आहे मी. अजूनपर्यंत आयडिया सुचलेली नाहीये. सो, तुमची मदत लागेल,” असं अभिनयने म्हटलं.

तसंच, आउट ऑफ द बॉक्स आणि क्रेझी बिझनेस आयडिया असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये शेअर करण्याचं आवाहनही त्याने चाहत्यांना केलं आहे. चांगल्या कल्पना सुचवणाऱ्या व्यक्तींशी कोलॅबोरेशन करण्याची शक्यताही अभिनयने व्यक्त केली.

अभिनयच्या या नव्या निर्णयामुळे त्याचा पुढचा प्रवास नेमका कोणत्या दिशेने जाणार, याकडे आता चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर आता तो उद्योजकतेच्या क्षेत्रात नवं पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहे.


अभिनय बेर्डेचा सिनेसृष्टीला ब्रेक! निर्णयामागचं खरं कारण काय?
Total Views: 18