राजकीय
अमित शहांचा कोल्हापूर दौरा रद्द; प्रकृती अस्वस्थ, हुपरीतील कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह
By Shivani - 9/19/2026 3:11:58 PM
Share This News:
कोल्हापूर दौऱ्याआधी अमित शहांची प्रकृती बिघडली; हुपरीतील कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह
कोल्हापूर :
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा १९ आणि २० सप्टेंबरचा नियोजित कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आला आहे. हुबळीत मुक्कामादरम्यान त्यांच्या प्रकृतीत अस्वस्थता जाणवली. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिल्यानंतर त्यांनी नियोजित कार्यक्रमांना उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. त्यानंतर अमित शहा हुबळीतून दिल्लीच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.
अमित शहा यांच्या नियोजित दौऱ्यात हुपरी येथील कल्लाप्पाणा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरातील महालक्ष्मी ग्रीन एनर्जी प्रकल्पाचे भूमिपूजन हा प्रमुख कार्यक्रम होता. या प्रकल्पासाठी सुमारे ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असून, शून्य कचरा आणि ‘वेस्ट टू बेस्ट’ संकल्पनेवर आधारित हा प्रकल्प असल्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले होते.
अमित शहा यांच्या दोन दिवसीय कोल्हापूर दौऱ्याचे नियोजन यापूर्वी करण्यात आले होते. २० सप्टेंबर रोजी हुपरीतील ग्रीन एनर्जी प्रकल्पाच्या भूमिपूजनासह शेतकरी मेळाव्याचेही नियोजन होते.
दरम्यान, अमित शहा यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे हुपरीतील महालक्ष्मी ग्रीन एनर्जी प्रकल्पाचे भूमिपूजन आता कोणाच्या हस्ते होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमित शहांच्या अनुपस्थितीत हा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार का, याबाबत अद्याप अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा आहे.
अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हुपरी, कोल्हापूर आणि कर्नाटकात मोठी तयारी करण्यात आली होती. मात्र, प्रकृती अस्वस्थतेमुळे दौरा रद्द झाल्याने नियोजित कार्यक्रमांच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अमित शहा यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत वैद्यकीय माहिती किंवा पुढील कार्यक्रमांबाबत अधिकृत घोषणा झाल्यास त्यानुसार पुढील अपडेट समोर येईल.
अमित शहांचा कोल्हापूर दौरा रद्द; प्रकृती अस्वस्थ, हुपरीतील कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह
|