बातम्या
पर्ल टी एम. ग्रुपच्या नावाखाली लाखोंची फसवणूक – दोन आरोपी अटकेत, एक फरार
By nisha patil - 9/26/2025 6:33:41 PM
Share This News:
कोल्हापूर (दि. 26 सप्टेंबर 2025) :नागाळा पार्क येथील खानविलकर पेट्रोल पंपाजवळील पर्ल टी एम. ग्रुप या ऑफिसच्या माध्यमातून फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून कोल्हापूरात तब्बल 39 लाख 36 हजार 650 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शाहुपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी किशोर तानाजी जाधव (वय 49, रा. ताराबाई पार्क, कोल्हापूर) यांच्यासह साक्षीदार ओंकार नरके यांची मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. आरोपींनी गुंतवणुकीवर दरमहा 2.5 ते 2.75 लाख रुपये अथवा 6% परतावा मिळेल, असे आमिष दाखवले होते.
यामध्ये फिर्यादींकडून 30 लाख रुपये स्वीकारण्यात आले. त्यातील 4 लाख 10 हजार रुपयांच्या कमिशनपोटी जमीन दिली असली तरी 25 लाख 90 हजार रुपये परत न करता आरोपींनी अपहार केला.
या प्रकरणी शाहुपुरी पोलिसांनी खालील आरोपींवर गुन्हा नोंदवला आहे –
1. युवराज सदाशिव पाटील (रा. कलोली, ता. पन्हाळा) – यास 26 सप्टेंबर 2025 रोजी अटक
2. दिपक सर्जेराव पाटील (रा. कळे, ता. पन्हाळा) – यास 13 फेब्रुवारी 2025 रोजी अटकपूर्व जामीन
3. अविनाश मारुती राठोड (रा. जिंतुर, जि. परभणी) – फरार
या आरोपींवर भादंवि कलम 420, 406, 409, 34 तसेच एमपीआयडी कायद्याच्या कलम 3, 4, 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेकडील चौकशीत आरोपींनी विश्वासाने घेतलेली रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे उघड झाले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
पर्ल टी एम. ग्रुपच्या नावाखाली लाखोंची फसवणूक – दोन आरोपी अटकेत, एक फरार
|