कृषी

अथणी शुगरच्या ऊसदर परिपत्रकावर आंदोलन अंकुश आक्रमक; ₹5000 दराचा फॉर्म्युला कुठे?

athani sugar cane rate circular andolan ankush objection kolhapur


By Administrator - 11/17/2026 4:40:18 PM
Share This News:



ऊसदराचा तोडगा की शेतकऱ्यांची दिशाभूल? अथणी शुगरच्या परिपत्रकावर आंदोलन अंकुश आक्रमक!

₹५००० च्या दराचा फॉर्म्युला कुठे गेला? परिपत्रक तातडीने रद्द करून नव्याने काढण्याची मागणी; सर्व कारखान्यांना समान नियम लागू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे!

प्रतिनिधी : आचिन हेरवाडे

कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसदराचा प्रश्न अद्याप पूर्णपणे मार्गी लागलेला नसतानाच अथणी शुगरच्या शाहूवाडी युनिटने प्रसिद्ध केलेल्या ऊसदराच्या परिपत्रकावरून नवा वाद निर्माण झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ठरलेल्या ऊसदराच्या प्रस्तावातील पुढील दरवाढीचा फॉर्म्युला अथणी शुगरच्या परिपत्रकात स्पष्टपणे नमूद नसल्याचा आक्षेप आंदोलन अंकुश संघटनेने घेतला आहे. त्यामुळे हे परिपत्रक तातडीने रद्द करून बैठकीतील निर्णयानुसार नव्याने परिपत्रक काढावे, तसेच जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना एकसमान नियम लागू करावेत, अशी मागणी संघटनेने जिल्हाधिकारी विजय राठोड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

५ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली ऊसदराचा तोडगा काढण्यासाठी बैठक झाली होती. या बैठकीत चर्चेनंतर ३९०० रुपये पहिली उचल, गळीत हंगाम संपल्यानंतर १०० रुपये अतिरिक्त आणि वर्षभर साखरेचा दर प्रतिकिलो ४५ रुपयांपेक्षा अधिक राहिल्यास आणखी २०० रुपये देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यापुढे साखरेचा दर अधिक राहिल्यास बसून फॉर्म्युला ठरवून पुढील दर देण्याचेही नमूद करण्यात आले होते.

मात्र, अथणी शुगरने १२ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात ३९०० रुपये पहिली उचल, हंगाम संपल्यानंतर १०० रुपये आणि वर्षभरातील साखरेचा सरासरी विक्रीदर प्रतिकिलो ४५ रुपयांपेक्षा अधिक मिळाल्यास २०० रुपये अंतिम हप्ता देण्याचे जाहीर केले आहे. याशिवाय सर्व सभासद आणि बिगरसभासद ऊस उत्पादकांना प्रतिटन एक किलो साखर सवलतीच्या दरात देण्याचेही जाहीर केले आहे.

मात्र, साखरेचा दर ४५ रुपयांच्या पुढे गेल्यानंतर किंवा त्यापेक्षाही अधिक वाढल्यानंतर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अतिरिक्त दराबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत नमूद केलेला पुढील फॉर्म्युला अथणी शुगरच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलेला नाही. त्यामुळे बैठकीतील तोडगा आणि कारखान्याचे परिपत्रक यामध्ये नेमका फरक काय, असा सवाल आंदोलन अंकुशने उपस्थित केला आहे.

साखरेचा दर वाढतोय; मग शेतकऱ्यांच्या पदरात किती?

साखरेच्या बाजारभावात वाढ होत असताना त्याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही मिळणे अपेक्षित आहे. साखरेचा विक्रीदर प्रतिकिलो ४५ रुपयांच्या पुढे गेल्यानंतर केवळ २०० रुपये अतिरिक्त देऊन कारखान्यांची जबाबदारी संपणार आहे का? साखरेचा दर ५० रुपये किंवा त्यापुढे गेल्यास शेतकऱ्यांना किती अतिरिक्त दर मिळणार? याबाबत कोणतीही स्पष्टता परिपत्रकात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आंदोलनातून अपेक्षित असलेला वाढीव ऊसदर प्रत्यक्षात मिळणार की केवळ घोषणांपुरताच मर्यादित राहणार, असा प्रश्न संघटनेने उपस्थित केला आहे.

२०२३ मधील अनुभवाची पुनरावृत्ती नको!

२०२३ मधील ऊसदर आंदोलनाचा अनुभवही आंदोलन अंकुशने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला आहे. त्यावेळी ३००० रुपये पहिली उचल देणाऱ्या कारखान्यांनी ५० रुपये, तर त्यापेक्षा कमी दर देणाऱ्या कारखान्यांनी १०० रुपये दुसरा हप्ता देण्याचा तोडगा झाला होता. मात्र, प्रत्यक्षात अनेक कारखान्यांनी ठरलेल्या तोडग्याप्रमाणे दर दिला नसल्याचा संघटनेचा आरोप आहे. जिल्ह्यातील केवळ पाच कारखान्यांनीच तोडग्याची अंमलबजावणी केल्याचा अनुभव असल्याचे संघटनेने निवेदनात नमूद केले आहे.

यंदाही अशाच प्रकारे कारखान्यांकडून वेगवेगळे परिपत्रक काढून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करणे आवश्यक असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी आता भूमिका स्पष्ट करावी!

अथणी शुगरचे परिपत्रक तातडीने रद्द करून जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेतील सर्व मुद्द्यांचा समावेश असलेले नवे परिपत्रक काढावे. जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना एकसमान नियम लागू करण्याचे आदेश द्यावेत. तसेच साखरेच्या बाजारभावातील वाढीचा योग्य फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल आणि त्यांना प्रतिटन ५००० रुपये दर मिळण्याच्या मागणीचा विचार होईल, यासाठी प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी आंदोलन अंकुशने केली आहे.

आता अथणी शुगरच्या परिपत्रकावर आंदोलन अंकुशने घेतलेल्या आक्षेपाची जिल्हाधिकारी प्रशासन कितपत दखल घेणार? सर्व कारखान्यांसाठी एकसमान ऊसदराचे नियम लागू होणार का? आणि शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला वाढीव दर प्रत्यक्षात मिळणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


ऊसदराचा तोडगा की शेतकऱ्यांची दिशाभूल? अथणी शुगरच्या परिपत्रकावर आंदोलन अंकुशचा आक्षेप!
Total Views: 233