विशेष बातम्या
बाळूमामा देवस्थान समितीवर पुन्हा आरोपांचा भडका
By nisha patil - 8/10/2025 12:30:02 PM
Share This News:
गारगोटी:- भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथील संत बाळूमामा देवस्थान विश्वस्त मंडळावर पुन्हा एकदा गंभीर आरोपांचा भडका उडाला आहे. देवस्थानासाठीच खरेदी केलेली जमीन पुन्हा विक्री करून तब्बल १ कोटी ६८ लाख २ हजार ५०० रुपयांचा संशयास्पद व्यवहार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची तक्रार भक्तांच्यावतीने राज्य धर्मादाय आयुक्तांकडे करण्यात आली असून, यासह अन्य व्यवहारांचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आदमापूर येथील गट क्रमांक १९१ मधील २३ गुंठे जमीन ही २०१५ ते २०१६ या कालावधीत देवस्थानच्या निधीतून देवस्थानसाठीच घेण्यात आली होती. मात्र, ती जमीन देवस्थानच्या नावावर न घेता ती त्या वेळीचे सचिव रावसाहेब वीरप्पा कोणकेरी यांच्या नावावर घेतल्याचा आरोप भक्तांनी केला आहे.
यानंतर कोणकेरी यांनी सप्टेंबर २०२५ मध्ये तीच जमीन प्रकाश पांडुरंग मांगले यांना वटमुखत्यारपत्राने विकली. आश्चर्य म्हणजे, मांगले यांनी हीच जमीन पुन्हा बाळूमामा देवस्थानलाच विकली आणि त्याबदल्यात ३ सप्टेंबर २०२५ रोजी १ कोटी ६८ लाख २ हजार ५०० रुपये देवस्थानाकडून घेतल्याचे समोर आले आहे.
या व्यवहाराबाबत अनेक शंका उपस्थित होत आहेत. एवढी मोठी रक्कम कोणाच्या नावावर आरटीजीएस केली गेली? ती रक्कम नेमकी कोणाच्या खात्यात वर्ग झाली किंवा रोख स्वरूपात दिली गेली का? आता पुन्हा देवस्थानकडेच पैसे परत करण्यासाठी हालचाली का सुरू आहेत? असे प्रश्न ग्रामस्थ आणि भक्तांकडून विचारले जात आहेत.
या संदर्भात देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी सांगितले की, “देवस्थानलाच पुन्हा विक्री झाल्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत. या प्रकरणात पारदर्शक चौकशी होणार आहे.”
दरम्यान, सचिव रावसाहेब कोणकेरी यांनी स्पष्ट केले की, “ही घटना अनवधानाने घडली आहे. जमीन देवस्थानच्या नावावर केली जाणार असून, या व्यवहारापोटी कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही.”
भक्तांनी या संशयास्पद प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
बाळूमामा देवस्थान समितीवर पुन्हा आरोपांचा भडका
|