राजकीय
21 वर्षीय सौरभ तायडे सिंदखेड राजा नगराध्यक्ष; महाराष्ट्रातील सर्वात तरुण नगराध्यक्ष ठरले
By nisha patil - 12/24/2025 1:51:18 PM
Share This News:
बुलढाणा:- सिंदखेड राजा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी 21 वर्षीय सौरभ तायडे यांची निवड झाली असून, या निकालामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात नवा इतिहास घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरद पवार गट) युवा नेतृत्वावर विश्वास दाखवत त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. सौरभ तायडे हे महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचे नगराध्यक्ष ठरले असून, त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या निवडीमुळे स्थानिक राजकारणात युवकांना मिळालेल्या संधीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. निकालानंतर प्रतिक्रिया देताना सौरभ तायडे यांनी पक्षाचे आभार मानले. “इतक्या तरुण वयात माझ्यावर विश्वास ठेवून पक्षाने जबाबदारी दिली, याबद्दल मी पक्ष नेतृत्वाचा मनापासून आभारी आहे,” असे ते म्हणाले.
वयावरून टीका करणाऱ्या विरोधकांना प्रत्युत्तर देताना त्यांनी विकासाचा मुद्दा उपस्थित केला. “विरोधक म्हणतात की 21 वर्षांच्या तरुणाला अनुभव नाही. पण इतका अनुभव असूनही त्यांनी मागील अनेक वर्षांत गावाचा विकास का केला नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सिंदखेड राजाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस धोरण राबवून काम करून दाखवण्याचा निर्धार सौरभ तायडे यांनी व्यक्त केला. या विजयामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
21 वर्षीय सौरभ तायडे सिंदखेड राजा नगराध्यक्ष; महाराष्ट्रातील सर्वात तरुण नगराध्यक्ष ठरले
|