बातम्या
अंत्यसंस्काराआधीच पोलिसांची एन्ट्री! १७ वर्षीय मुलीच्या मृत्यूमागचं भयंकर सत्य उघड
By Shivani - 8/30/2026 4:28:20 PM
Share This News:
अंत्यसंस्काराआधीच पोलिसांची एन्ट्री! १७ वर्षीय मुलीच्या मृत्यूमागचं भयंकर सत्य उघड
भोपाळ :
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या कथित ऑनर किलिंगचे प्रकरण समोर आले आहे. पिपलाणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रेमसंबंध आणि लग्नावरून झालेल्या वादातून मुलीची तिची आई आणि मामाने ओढणीने गळा आवळून हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी आई कमला आणि मामा विजय राय यांना अटक केली आहे.
प्रेमसंबंधावरून आई-मुलीत वारंवार वाद
पोलिसांच्या माहितीनुसार, सुमारे सहा महिन्यांपूर्वी मुलीच्या आईने तिचे लग्न ठरवून साखरपुडा केला होता. मात्र, मुलगी या लग्नासाठी तयार नव्हती. ती दुसऱ्या एका तरुणावर प्रेम करत होती आणि त्याच्याशीच लग्न करण्याची इच्छा व्यक्त करत होती. याच कारणावरून आई आणि मुलीमध्ये वारंवार वाद होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेच्या दिवशी आईने मुलीच्या मोबाईलमध्ये एका तरुणाचे फोटो पाहिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर दोघींमध्ये पुन्हा जोरदार वाद झाला.
वाद वाढला अन् मुलीचा गळा आवळल्याचा आरोप
वाद विकोपाला गेल्यानंतर आईने तिचा भाऊ विजय राय याच्या मदतीने मुलीचा ओढणीने गळा आवळला, असा पोलिसांचा आरोप आहे. यामध्ये मुलीचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
घटनेनंतर नातेवाईकांकडून मृतदेहाचे पोस्टमार्टम न करता अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू होती. मात्र, याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोस्टमार्टम रिपोर्टमधून हत्येचा उलगडा
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. पोस्टमार्टम अहवालात गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास हत्येच्या दिशेने पुढे नेला.
तपासादरम्यान पोलिसांनी मुलीची आई कमला आणि मामा विजय राय यांना अटक केली. दोन्ही आरोपींची चौकशी सुरू असून, हत्येमागील नेमकी परिस्थिती तसेच या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
घरातून ओरडण्याचा आवाज आल्याचा दावा
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मुलीचे तिच्या आईसोबत यापूर्वीही वारंवार वाद होत होते. घटनेच्या दिवशीही घरातून ओरडण्याचे आवाज ऐकू आल्याचे स्थानिकांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास पिपलाणी पोलीस करत आहेत.
Bhopal Crime News: १७ वर्षीय मुलीची हत्या; आई-मामा अटकेत
|