खेळ
शरीरसौष्ठव स्पर्धेत कोल्हापूर, कल्याणचा दबदबा
By nisha patil - 11/15/2025 11:10:39 AM
Share This News:
अमरावती, दि. १३ नोव्हेंबर २०२५: महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी शरीरसंपदा कमावत येथील राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये शरीरसौष्ठव स्पर्धेत प्रेक्षकांची मने जिंकली. कल्याण-रत्नागिरी संघ व कोल्हापूर संघाने प्रत्येकी दोन सुवर्ण पदक जिंकले.
येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडा संकुलात बुधवारी (दि. १२) सायंकाळी सहा वजनगटामध्ये शरीर सौष्ठव स्पर्धा झाली. यामध्ये तब्बल ४८ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. वीजसेवेच्या धकाधकीचे दैनंदिन कामकाज सांभाळून शरीराला सुडौल व सुबद्ध आकार देत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी या स्पर्धेत पिळदार शरीरयष्टीचे दमदार प्रदर्शन केले व प्रेक्षकांची वाहवा मिळवली. यात कोल्हापूर संघाने २ सुवर्णपदक व २ रौप्यपदक पटाकवले. त्यानंतर कल्याण-रत्नागिरी संघाने २ सुवर्णपदक व १ रौप्यपदक मिळवले.
शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये वजनगटनिहाय विजेते व उपविजेते पुढीलप्रमाणे - ६५ किलो- सुनील सावंत (कल्याण) व शिवम चौघुले (कोल्हापूर), ७० किलो– गोपाल कुलकर्णी (कल्याण) व अमित पाटील (कोल्हापूर), ७५ किलो- नामदेव शिंदे (नाशिक), राजेंद्र जाधव (रत्नागिरी), ८० किलो- राहुल कांबळे (कोल्हापूर) व गोकुल सोनवणे (नाशिक), ९० किलो– प्रविण गुणके (कोल्हापूर) व कैलेश्वर सांगवे (पुणे) आणि ९० किलोवरील वजनगटात मो. मुजाहिद अन्वर (अमरावती) व अपुर्व शिर्के (कल्याण).
महावितरणच्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये चुरशीचे सामने होत असल्याने अजिंक्यपदासाठी रंगत वाढली आहे. विविध सामन्यांना क्रीडा प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धेच्या दोन दिवसांमध्ये टेबल टेनिसमध्ये पुरुष गटामध्ये छत्रपती संभाजीनगर-नांदेड-लातूर संघाने मुख्यालय-भांडूप संघावर अंतिम फेरीत विजय मिळवत विजेता ठरला. तर महिला गटात अमरावती-अकोला संघ व कल्याण-रत्नागिरी संघात अंतिम लढत होईल. ब्रिज खेळामध्ये अमरावती-अकोला संघाने विजेतेपद पटकावले.
कॅरम पुरुष गटामध्ये चुरशीच्या लढतीत छत्रपती संभाजीनगर-लातूर-नांदेड संघाने विजेतेपद पटकावले तर नागपूर-गोंदिया-चंद्रपूर संघाला उपविजेतेपद मिळाले. तसेच टेनिक्वाईटमध्ये महिला गटात कोल्हापूर संघ विजेता ठरला. व्हॉलिबॉल सामन्यात पुणे-बारामती संघाने व छत्रपती संभाजीनगर-नांदेड-लातूर यांनी उपांत्य फेरी गाठली आहे.
शरीरसौष्ठव स्पर्धेत कोल्हापूर, कल्याणचा दबदबा
|