शैक्षणिक

बोईसरमधील शाळांभोवती जंक फूड, गुटखा-सिगारेटची सर्रास विक्री? FDAच्या ५० मीटर नियमाला हरताळ

boisar schools junk food tobacco sale fda rules


By Shivani - 8/27/2026 4:55:53 PM
Share This News:



बोईसरमधील शाळांभोवती जंक फूड, तंबाखूची विक्री? प्रशासनाच्या आदेशांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह

बोईसर :

विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने शाळांच्या परिसरात जंक फूड तसेच जास्त प्रमाणात फॅट, साखर आणि मीठ असलेल्या खाद्यपदार्थांच्या विक्रीवर, जाहिरातीवर आणि मोफत वाटपावर निर्बंध घातले आहेत. शाळेच्या प्रवेशद्वारापासून ५० मीटर परिसरात या नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश असतानाही बोईसर शहरासह बोईसर पूर्वेकडील शाळा-महाविद्यालय परिसरात या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

विशेषतः काही टपऱ्या आणि दुकानांमध्ये विद्यार्थ्यांच्या सहज आवाक्यात सिगारेट, तंबाखू आणि गुटखा यांसारख्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. त्यामुळे शाळांच्या परिसरातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

५० मीटर परिसरात जंक फूडवर निर्बंध

अन्न व औषध प्रशासनाच्या निर्देशानुसार शाळेच्या आवारात तसेच प्रवेशद्वारापासून ५० मीटर परिसरात उच्च प्रमाणात फॅट, साखर आणि मीठ असलेल्या खाद्यपदार्थ व पेयांची विक्री, जाहिरात किंवा मोफत वाटप रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वडापाव, समोसा, चिप्स, बर्गर, चॉकलेट, आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स आणि तत्सम खाद्यपदार्थ या निर्बंधांच्या कक्षेत येतात.

शाळा किंवा विद्यार्थ्यांना अन्न पुरवणाऱ्या कॅन्टीन आणि संबंधित आस्थापनांकडे आवश्यक FSSAI परवाना किंवा नोंदणी असणेही बंधनकारक आहे.

बोईसरमध्ये नियमांची अंमलबजावणी कुठे?

बोईसर शहर आणि बोईसर पूर्व परिसरातील काही शाळा-महाविद्यालयांच्या आसपास खाद्यपदार्थांच्या टपऱ्या आणि दुकाने मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांची शाळा सुटण्याच्या वेळेत या ठिकाणी मोठी गर्दी होत असल्याचेही सांगितले जात आहे.

याच परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्यास संबंधित नियमांचे पालन होते आहे का, याची तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

प्रशासनाच्या आदेशांचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष फायदा किती?

शाळांच्या आसपास विद्यार्थ्यांना आरोग्यास घातक ठरू शकणारे खाद्यपदार्थ आणि तंबाखूजन्य पदार्थ सहज उपलब्ध होत असतील, तर प्रशासनाच्या निर्बंधांचा प्रत्यक्ष फायदा विद्यार्थ्यांना किती मिळत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

शाळांच्या परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांची तपासणी, FSSAI परवान्यांची पडताळणी आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. संबंधित प्रशासन या तक्रारींची दखल घेऊन बोईसर शहर व बोईसर पूर्व परिसरातील शाळा-महाविद्यालयांभोवती विशेष तपासणी मोहीम राबवणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


बोईसरच्या शाळांभोवती जंक फूड, गुटखा विक्री? FDAच्या ५० मीटर नियमांची अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह
Total Views: 15