शैक्षणिक

चौके हायस्कूलच्या पोरांचा नादखुळा.

boys from Chowke High School


By nisha patil - 4/7/2025 5:41:59 PM
Share This News:



चौके हायस्कूलच्या पोरांचा नादखुळा.

शाळेत रंगला अनोखा चिखल महोत्सव

आपण आजवर खाद्य महोत्सव, नाट्य महोत्सव, चित्रपट महोत्सव अनेक पाहिले असतील, पण तुम्ही कधी ‘चिखल महोत्सव’ पाहिला आहे का? नाही ना! पण राधानगरी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल मानबेट पैकी चौके या शाळेत आज शुक्रवारी असाच अनोखा चिखल महोत्सव भरला, तोही अगदी दणक्यात!

मातीशी नाळ जोडणारा, मातीच्या मायेची उब देणारा हा आगळा-वेगळा महोत्सव पाहायला माजी विद्यार्थी, गावकरी, गृहिणी आणि लहानथोर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सध्या राधानगरी तालुक्यात पावसाने धूम माजवलीय आणि त्यातच या पावसात चिखलात खेळण्याचा आनंद या विद्यार्थ्यांना लुटता आला.

या चिखल महोत्सवाची भन्नाट कल्पना शाळेचे क्रीडा शिक्षक डी. आर. नलवडे यांच्या संकल्पनेतून साकारली गेली. चिखलामध्ये खेळताना कुठलाही संसर्ग होऊ नये म्हणून अंगावर हळद आणि गोमूत्र शिंपडण्यात आलं आणि मग सुरु झाला एकच जल्लोष!

ना गणवेशाचं बंधन, ना वेळेचं बंधन — आवडेल तो खेळ, हवे तेवढे वेळ — सगळं चिखलात! कोणी फुटबॉल खेळलं, कोणी रस्सीखेच केली, कोणी लंगडी आणि कोणी फुगडी! इतकंच काय, संगीताच्या तालावर चिखलात नृत्य देखील केलं.

या महोत्सवाचं औपचारिक उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक एस. एम. खडके यांच्या हस्ते झालं. आणि विशेष म्हणजे शिक्षकही मुलांसोबत चिखलात मस्त दंग झाले. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील दरी कमी व्हावी, एकमेकांशी जवळीक वाढावी, म्हणूनच हे खास आयोजन करण्यात आलं होतं.


Chowke High School...चौके हायस्कूलच्या पोरांचा नादखुळा.
Total Views: 108