राजकीय

CJP ची क्या बोलती पब्लिक मोहिम जाहीर अभिजीत दीपके यांचा सरकारवर निशाणा

cjp kya bolti public campaign abhijit deepke sambhajinagar


By nisha patil - 6/8/2026 5:16:45 PM
Share This News:



'क्या बोलती पब्लिक?' अभियानाची CJP ची घोषणा; अभिजीत दीपके यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

छत्रपती संभाजीनगर :

दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर राष्ट्रीय चर्चेत आलेल्या कॉक्रोच जनता पार्टी (CJP) ने आता देशभर जनमत जाणून घेण्यासाठी 'क्या बोलती पब्लिक?' या विशेष अभियानाची घोषणा केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या पक्षाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कोअर कमिटी बैठकीनंतर संस्थापक अभिजीत दीपके यांनी हा अॅक्शन प्लॅन जाहीर केला. दीपके यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीचा गुरुवारी (6 ऑगस्ट) समारोप झाला. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पक्षाच्या आगामी कार्यक्रमांची माहिती दिली.

सप्टेंबरपासून देशभर 'क्या बोलती पब्लिक?' अभियान

अभिजीत दीपके यांनी सांगितले की, सप्टेंबर महिन्यापासून महाराष्ट्रासह देशभर 'क्या बोलती पब्लिक?' हे अभियान राबवण्यात येणार आहे. या माध्यमातून नागरिकांच्या भावना, अपेक्षा आणि विविध प्रश्न जाणून घेऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावर मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आंबेडकर, गांधी आणि नेहरूंच्या विचारांवर पक्षाची वाटचाल

CJP ची विचारधारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या तत्त्वांवर आधारित असल्याचे दीपके यांनी सांगितले. संविधानाच्या चौकटीत राहून देशासाठी लढा देणे हेच पक्षाचे ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिक्षण, बेरोजगारी आणि NEET प्रकरणावर सरकारवर टीका

देशातील शिक्षण दिवसेंदिवस महाग होत असून सर्वसामान्यांसाठी ते परवडणारे राहिले नसल्याची टीका दीपके यांनी केली. NEET परीक्षा प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी बेरोजगारी हा देशातील गंभीर सामाजिक आणि राजकीय प्रश्न असल्याचे सांगितले.

न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग आणि माध्यमांवरही प्रश्न

यावेळी अभिजीत दीपके यांनी न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग आणि माध्यमांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. माध्यमांनी सत्तेला कठोर प्रश्न विचारले पाहिजेत आणि लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी स्वतंत्र पत्रकारिता आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सर्व संघटना आणि नागरिकांना सोबत घेऊन आगामी काळात व्यापक जनआंदोलन उभारणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.


Kya Bolti Public Campaign
Total Views: 11