मनोरंजन
दशमी मराठी चित्रपट ऑक्टोबरमध्ये रिलीज; महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे मुख्य भूमिकेत
By Shivani - 10/8/2026 5:15:22 PM
Share This News:
‘दशमी’चा थरारक प्रवास! महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे यांचा मराठी सस्पेन्स-क्राईम थ्रिलर ऑक्टोबरमध्ये
Marathi Movie Update -
मराठी चित्रपटसृष्टीत सस्पेन्स-क्राईम थ्रिलरचा नवा अनुभव देण्यासाठी ‘दशमी’ हा बहुचर्चित मराठी चित्रपट सज्ज झाला आहे. केएनके बॉक्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केले आहे. विजयादशमीच्या संकल्पनेतून प्रेरणा घेतलेला ‘दशमी’ हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘दशमी’च्या पहिल्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
विजय, शक्ती आणि संघर्षाची झलक दाखवणाऱ्या ‘दशमी’च्या पहिल्या पोस्टरचे नुकतेच अनावरण करण्यात आले. अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट शक्तींवर स्त्रीशक्तीच्या विजयाचा संदेश या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. भारतीय संस्कृतीत विजयादशमीला विशेष महत्त्व आहे. भगवान श्रीरामांनी रावणाचा वध करून धर्माचा विजय प्रस्थापित केला, तर आदिशक्ती देवी दुर्गेने महिषासुराचा संहार करून शक्ती आणि धैर्याचा संदेश दिला. याच विजयाच्या विचारांना आधुनिक सामाजिक वास्तवाची जोड देत ‘दशमी’ची कथा साकारण्यात आली आहे.
महेश मांजरेकरांसह दिग्गज कलाकारांची फौज
‘दशमी’मध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, विजय निकम, गौरी इंगवले, प्रसन्न केतकर, देवेंद्र गायकवाड, शाम माशाळकर, राज कुंदन यांच्यासोबत दाक्षिणात्य अभिनेता रवि प्रकाश यांच्याही अभिनयाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
“प्रत्येक अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे बळ देणारा ‘दशमी’”
चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक योगेश पांडुरंग भोसले म्हणाले की, ‘दशमी’ हा केवळ चित्रपट नसून प्रत्येक मुलीला आणि प्रत्येक कुटुंबाला आत्मविश्वास व बळ देणारा विचार आहे. अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य आणि सत्याच्या विजयाचा प्रवास या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विजयादशमीच्या पारंपरिक संकल्पनेला आजच्या सामाजिक वास्तवाशी जोडण्याचा प्रयत्न ‘दशमी’च्या माध्यमातून करण्यात आला असून, प्रेक्षकांना केवळ मनोरंजन न देता विचार करायला लावणारा आणि मनावर ठसा उमटवणारा अनुभव देण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
सस्पेन्स, क्राईम आणि थराराचा अनोखा मेळ
‘दशमी’चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची रहस्यमय कथा आणि सस्पेन्स-क्राईम थ्रिलरचा बाज. कथानकातील रहस्ये एकाच वेळी समोर न येता टप्प्याटप्प्याने उलगडत जाणार आहेत. प्रत्येक टप्प्यावर नवे प्रश्न, अनपेक्षित वळणे आणि धक्कादायक खुलासे प्रेक्षकांची उत्सुकता कायम ठेवतील. बॉलिवूड चित्रपटांच्या धर्तीवर भव्य दृश्यरचना आणि उच्च दर्जाचे तांत्रिक सादरीकरण करण्यावरही विशेष भर देण्यात आला आहे. चित्रपटातील प्रत्येक फ्रेम बारकाईने साकारण्यात आली असून, प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर सिनेमॅटिक अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
सुरेश पंडित यांच्याकडे लेखन आणि संगीताची जबाबदारी
‘दशमी’च्या लेखन आणि संगीताची जबाबदारी सुरेश पंडित यांनी सांभाळली आहे. कथा, संगीत, अभिनय आणि तांत्रिक बाजू यांचा सुरेख मेळ साधत हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीत सस्पेन्स-क्राईम थ्रिलरचा नवा मापदंड निर्माण करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ऑक्टोबरमध्ये ‘दशमी’ मोठ्या पडद्यावर दाखल होणार असल्याने मराठी चित्रपटप्रेमींमध्ये या सिनेमाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
दशमी मराठी चित्रपट ऑक्टोबरमध्ये; महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे यांची प्रमुख भूमिका
|