देश विदेश
FTA विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन; राजू शेट्टी, महादेव जानकर ताब्यात, किसान घाटावर कडेकोट बंदोबस्त
By Shivani - 7/21/2026 4:09:54 PM
Share This News:
दिल्लीत FTA विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; राजू शेट्टी, महादेव जानकर ताब्यात, हजारो शेतकरी रोखले
नवी दिल्ली : भारत-अमेरिका प्रस्तावित मुक्त व्यापार करार (FTA) विरोधात देशभरातील शेतकरी संघटनांनी दिल्लीत आयोजित केलेल्या किसान महापंचायतीपूर्वीच राजधानीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधून दिल्लीकडे निघालेल्या अनेक शेतकऱ्यांना विविध ठिकाणी रोखण्यात आले, तर आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेले माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी मंत्री महादेव जानकर यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले.
शेतकरी संघटनांच्या माहितीनुसार, देशभरातील १५० हून अधिक शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी किसान घाट येथे पोहोचले होते. प्रस्तावित भारत-अमेरिका मुक्त व्यापार करारामुळे देशातील कृषी क्षेत्र, शेतमालाचे दर आणि शेतकऱ्यांचे हित धोक्यात येईल, असा आरोप करत हा करार मागे घेण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
राजघाट परिसरात शेतकरी नेत्यांना रोखताना पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये काही काळ शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर राजू शेट्टी, महादेव जानकर यांच्यासह अनेक आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
ताजी अपडेट
दिल्लीच्या सीमांवर मोठ्या प्रमाणात बॅरिकेड्स उभारण्यात आले असून, शंभू सीमेवरून दिल्लीकडे येणाऱ्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी अतिरिक्त पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहेत. किसान घाट परिसरातही कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून, राजधानीतील वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे.
दरम्यान, शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला असून, केंद्र सरकारने प्रस्तावित मुक्त व्यापार कराराबाबत भूमिका स्पष्ट करावी आणि शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
raju sheeti : farmer protest
|