राजकीय
हॉकी स्टेडियम जवळील जागेवर मराठा भवन करण्याची मागणी- सतेज पाटील
By nisha patil - 8/9/2025 7:25:10 PM
Share This News:
कोल्हापूर : विश्वपंढरीच्या समोरील शासनाच्या मालकीच्या रि. स. नं. 697 अ/6 या भूखंडावर मराठा भवन, प्रशस्त नाट्यगृह, सार्वजनिक बाग व ऑक्सिजन पार्क उभारण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे सोमवारी निवेदनाद्वारे केली आहे. महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनाही त्यांनी हे निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हंटले आहे की, मराठा समाजाच्या सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र मराठा भवन आवश्यक आहे. या भवनात यूपीएससी–एमपीएससी मार्गदर्शन केंद्र, मराठा संस्कृतीचे दालन, सामुदायिक विवाह मंडप, महिला सबलीकरण उपक्रम, युवकांना शैक्षणिक मार्गदर्शन, शेतकऱ्यांसाठी प्रदर्शने आणि विद्यार्थ्यांसाठी निवास व्यवस्था यांचा समावेश होऊ शकतो. शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन या भूखंडावर प्रशस्त नाट्यगृह, सार्वजनिक बाग व ऑक्सिजन पार्क उभारणेही गरजेचे आहे. यामुळे शहराच्या सामाजिक-सांस्कृतिक विकासाला चालना मिळेल आणि सर्वसामान्यांना सार्वजनिक सोयी-सुविधा उपलब्ध होतील. त्यामुळे या जागेवर मराठा भवन उभारा अशी मागणी आमदार पाटील यांनी केली.
हॉकी स्टेडियम जवळील जागेवर मराठा भवन करण्याची मागणी- सतेज पाटील
|