बातम्या
ऊस गाळपाला प्रतिटन ७०० रुपयांपर्यंत मदत द्या; धनंजय महाडिकांची मागणी
By Administrator - 11/14/2026 5:54:35 PM
Share This News:
शेतकरी आणि साखर कारखान्यांना प्रतिटन ५०० ते ७०० रुपये मदत द्या; धनंजय महाडिकांची अमित शाहांकडे मागणी!
सोलापूरसह महाराष्ट्रासाठी विशेष मदत पॅकेजची मागणी; शेतकरी, साखर उद्योग आणि पशुधनाला दिलासा देण्याचे आवाहन
कोल्हापूर :
अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे महाराष्ट्रातील शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकरी, साखर कारखाने आणि पशुधनासाठी केंद्र सरकारने विशेष मदत पॅकेज जाहीर करावे. तसेच बाधित साखर कारखान्यांना गाळप केलेल्या उसामागे प्रतिटन ५०० ते ७०० रुपयांचे अर्थसहाय्य द्यावे, अशी मागणी राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यंदा महाराष्ट्रातील अनेक भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. जमिनीतील ओलावा कमी होणे, पाणीटंचाई आणि दीर्घकाळ कोरडी परिस्थिती राहिल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचा परिणाम रब्बी पेरणी आणि पशुपालनावरही होत आहे. विशेषतः सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने पिकांची वाढ खुंटली असून ऊस शेतीला मोठा फटका बसला आहे.
अपुर्या पावसामुळे उसाची उंची, वजन आणि गुणवत्ता घटली आहे. चालू गाळप हंगामात सोलापूर विभागातील साखर उतारा सुमारे ७.५ ते ७.७ टक्के राहण्याची शक्यता असल्याचे महाडिक यांनी निवेदनात नमूद केले आहे. कमी उताऱ्यामुळे साखर उत्पादन घटणार असून कारखान्यांवर आर्थिक ताण वाढणार आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांचेही उत्पादन आणि उसाच्या वजनातील घटीमुळे नुकसान होत आहे. त्यामुळे हा आर्थिक भार केवळ शेतकरी किंवा कारखान्यांवर टाकणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर बाधित साखर कारखान्यांना प्रतिटन ५०० ते ७०० रुपये विशेष केंद्रीय अर्थसहाय्य देण्याची योजना सुरू करावी, अशी प्रमुख मागणी महाडिक यांनी केली आहे. यामुळे कारखान्यांना आर्थिक दिलासा मिळून शेतकऱ्यांची ऊस बिले वेळेत देणे शक्य होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय बाधित जिल्ह्यांमध्ये पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करून विशेष दुष्काळी मदत द्यावी, पीकविमा दावे लवकर निकाली काढावेत आणि सोलापूरसह ऊस उत्पादक भागांतील शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी विशेष अर्थसहाय्य द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
चाराटंचाईमुळे पशुपालकांसमोर निर्माण झालेल्या संकटाकडेही महाडिक यांनी लक्ष वेधले आहे. जनावरांसाठी चारा डेपो आणि छावण्या सुरू कराव्यात, चारा खरेदीसाठी आर्थिक मदत द्यावी आणि पुरेशा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
साखर उद्योगावर ग्रामीण रोजगार, वाहतूक, शेतमजूर आणि हजारो शेतकऱ्यांची उपजीविका अवलंबून असल्याने या संकटाकडे संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेचे आव्हान म्हणून पाहावे, असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले आहे. त्यांच्या या मागण्यांना केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
ऊस गाळपाला प्रतिटन ७०० रुपयांपर्यंत मदत द्या; धनंजय महाडिकांची मागणी
|