आरोग्य
धनगरमोळा येथे विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन शिबिर संपन्न
By Shivani - 9/25/2026 4:56:48 PM
Share This News:
धनगरमोळा येथे विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न
संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ पेन्शन, डिजिटल रेशन कार्ड, आयुष्मान भारत गोल्डन कार्डसह विविध योजनांची ग्रामस्थांना माहिती
आजरा प्रतिनिधी | हसन तकीलदार :
धनगरमोळा पंचक्रोशीतील ग्रामस्थांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळावी आणि पात्र लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देता यावा, या उद्देशाने आदर्श कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, धनगरमोळा यांच्या वतीने विशेष शासकीय योजना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन आजरा तहसीलदार समीर माने यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिरात महसूल विभागाच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, पुरवठा विभागाच्या डिजिटल रेशन कार्ड, अंत्योदय व इतर पात्र लाभार्थी योजना, तसेच पीएम किसान योजना, आधार कार्ड आणि आयुष्मान भारत गोल्डन कार्ड याबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले.
याशिवाय ‘लक्ष्मी’ योजनेअंतर्गत सात-बारा उताऱ्यावर महिलांची नावे मोफत नोंदविण्याबाबतही नागरिकांना माहिती देण्यात आली. विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित असल्याने ग्रामस्थांना शासकीय योजनांबाबत थेट मार्गदर्शन आणि आवश्यक माहिती मिळाली.
१९९२ पासून सामाजिक उपक्रमांची परंपरा
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंडळाचे अध्यक्ष कॉ. प्रकाश मोरुस्कर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. गणेशोत्सवानिमित्त मंडळाने राबविलेल्या विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.
सन १९९२ पासून आदर्श कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि महिलांसाठी आरोग्य शिबिरे, शासकीय योजना मार्गदर्शन शिबिरे तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करत असल्याचे त्यांनी सांगितले. याच सामाजिक कार्याचा पुढील टप्पा म्हणून तहसीलदार कार्यालयाच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
तहसीलदार समीर माने यांच्याकडून मंडळाच्या उपक्रमांचे कौतुक
प्रमुख पाहुणे तहसीलदार समीर माने यांनी मंडळाच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत वंचित, गरजू आणि गरीब नागरिकांसाठी कार्य करणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांनी एकत्रितपणे अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविल्यास समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होईल, असेही तहसीलदार माने यांनी नमूद केले.
लाभार्थ्यांना डिजिटल रेशन कार्ड आणि आयुष्मान कार्डचे वितरण
तहसीलदार समीर माने यांच्या हस्ते लाभार्थ्यांना डिजिटल रेशन कार्ड, आयुष्मान कार्ड आणि गोल्डन कार्डचे वितरण करण्यात आले.
धनगरमोळा ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार नवीन गावठाणातील प्लॉटधारकांना स्वतंत्र सात-बारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही तहसीलदारांनी दिली. तसेच शेतजमिनीशी संबंधित प्रलंबित प्रश्नही तातडीने सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
आरोग्य योजनांबाबतही मार्गदर्शन
गवसे आरोग्य विभागाच्या डॉ. रुक्सार यांनी आरोग्य विभागाच्या विविध योजना, उपलब्ध उपचारपद्धती तसेच आजार होण्यापूर्वीच आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास गवसे विभागाचे सर्कल अधिकारी प्रवीण खरात, पुरवठा निरीक्षक चव्हाण, संजय गांधी विभागाचे संतोष सांगळे, सुळेरान महसूल सहायक अधिकारी संतोष पाटील, गवसे महसूल विभागाच्या पाटील मॅडम, आरोग्य विभागाचे साबखान आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.
तसेच मंडळाचे सचिव तुषार खरुडे, कार्याध्यक्ष संतोष शेटगे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धनगरमोळा पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच महिलांनी मोठ्या संख्येने शिबिराला उपस्थित राहून विविध शासकीय योजनांची माहिती घेतली आणि शिबिराचा लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणारे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ आणि उपस्थितांचे मंडळाचे उपाध्यक्ष नामदेव जाधव यांनी आभार मानले.
धनगरमोळा येथे विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन शिबिर संपन्न
|