बातम्या
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई – १ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त
By nisha patil - 9/25/2025 7:06:18 PM
Share This News:
कोल्हापूर (दि. २५ सप्टेंबर) :कोल्हापूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने नशिली MEPHENTERMINE SULPHATE इंजेक्शनची अवैध विक्री करणाऱ्या दोघा इसमांना अटक केली असून, एकूण ₹१,७४,१५० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
गोपनीय माहितीच्या आधारे निंबाळकर चौक – रेडीयंट हॉटेल रोड येथे सापळा रचण्यात आला. त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या अॅक्टीव्हा (एमएच-०९-डीसी-३२७७) वरून आलेल्या एका इसमाने दुसऱ्या इसमाकडून बॉक्स स्वीकारून डिक्कीत ठेवताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्यांची नावे –
1. तेजस उदयकुमार महाजन (वय ३५, रा. शिवाजी पार्क, कोल्हापूर) – महाजन मेडिकल, कदमवाडीचा मालक.
2. विवेक शिवाजी पाटील (वय ३०, रा. माळीवाडी, उत्चगाव, ता. करवीर).
त्यांच्याकडून MEPHENTERMINE SULPHATE इंजेक्शनच्या १५ बाटल्या, गुन्ह्यासाठी वापरलेली अॅक्टीव्हा व मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्याविना आणि परवान्याविना नशिली इंजेक्शनची विक्री व खरेदी केल्याप्रकरणी शाहुपुरी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, अंमलदार वैभव पाटील, योगेश गोसावी, शिवानंद मठपती, राजू कोरे, प्रदीप पाटील, विलास किरोळकर, शुभम संकपाळ, लखन पाटील, संतोष बरगे, विशाल खराडे, गजानन गुरव, सुशील पाटील, सागर चौगले यांच्या पथकाने केली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई – १ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त
|