शैक्षणिक

डी. वाय. पाटील विद्यापीठात नॅनोतंत्रज्ञानावर आंतरराष्ट्रीय परिषद

dy patil university international conference functional materials kolhapur


By Administrator - 5/11/2026 5:18:38 PM
Share This News:



डी. वाय. पाटील विद्यापीठात ऊर्जा, जैवसाहित्य आणि नॅनोतंत्रज्ञानावर आंतरराष्ट्रीय परिषद; स्वीडन विद्यापीठाचा सहभाग

कोल्हापूर :

जागतिक स्तरावर संशोधन, नवकल्पना आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्याला चालना देण्याच्या उद्देशाने कोल्हापूरच्या डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी अभिमत विद्यापीठात आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आणि स्वीडनमधील मिड स्वीडन युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ३ नोव्हेंबर २०२६ रोजी ही परिषद उत्साहात पार पडली.

‘बायलॅटरल इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन फंक्शनल मटेरियल्स फॉर ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीज’ असे या परिषदेचे नाव होते. ‘फंक्शनल मटेरियल्स टू अ सस्टेनेबल फ्युचर’ या संकल्पनेवर आधारित परिषदेत प्रगत कार्यात्मक पदार्थ, जैवसाहित्य, ऊती अभियांत्रिकी, ऊर्जा साठवण व रूपांतरण, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान तसेच इलेक्ट्रॉनिक आणि ऑप्टोइलेक्ट्रॉनिक पदार्थ अशा महत्त्वपूर्ण विषयांवर जागतिक स्तरावरील संशोधकांनी विचारमंथन केले.

मिड स्वीडन युनिव्हर्सिटीचे इनोव्हेशन अँड बिझनेस को-ऑपरेशनचे उपकुलगुरू प्रा. हान्स-एरिक निल्सन आणि डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेशकुमार शर्मा यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले. यावेळी दोन्ही विद्यापीठांतील १२ संशोधक आणि प्राध्यापकांनी आपापल्या संस्थांमधील संशोधन कार्याचे सादरीकरण केले.

परिषदेच्या पहिल्या सत्रात ऊर्जा साठवण आणि ऊर्जा रूपांतरणासाठी आवश्यक असलेल्या प्रगत पदार्थांवर चर्चा करण्यात आली. प्रा. उमाकांत पाटील यांनी बाइंडर-फ्री थिन फिल्म इलेक्ट्रोड्स, तर प्रा. जोनास ऑर्टेग्रेन यांनी बॅटरीसाठी नॅनोमटेरियल्स या विषयावर संशोधन मांडले. याशिवाय डॉ. विजय कुंभार यांनी मेटल ऑक्साइड हेटरोस्ट्रक्चर्स, प्रा. रेयुन झांग यांनी स्मार्ट सेन्सिंग आणि ऊर्जा संकलनासाठी सॉलिड-स्टेट उपकरणे, तर डॉ. प्रवीण पवार यांनी फोटॉनिक्स आणि जैववैद्यकीय क्षेत्रातील फंक्शनल ग्लासेस यावर मार्गदर्शन केले.

दुसऱ्या सत्रात जैवसाहित्याच्या आधुनिक उपयोगांवर भर देण्यात आला. प्रा. मॅग्नस नॉरग्रेन यांनी सेल्युलोजचे विविध उपयोग, असोसिएट प्रोफेसर क्रिस्टीना डाहलस्ट्रॉम यांनी सेल्युलोज-आधारित ट्रायबोइलेक्ट्रिक मटेरियल्स, तर डॉ. शिवाजी काष्टे यांनी टिश्यू इंजिनिअरिंगमधील जैवसाहित्याचे महत्त्व स्पष्ट केले. प्रा. मनीषा फडतरे यांनी शाश्वत पदार्थ, तर प्रा. अर्पिता तिवारी यांनी बायोसेन्सिंगसाठी बायोफंक्शनलाइज्ड मटेरियल्स या विषयांवर संशोधन सादर केले.

या आंतरराष्ट्रीय परिषदेचे संयोजन प्रा. उमाकांत पाटील आणि प्रा. मनीषा फडतरे यांनी केले. परिषदेचा समारोप डॉ. प्रा. प्रमोद एस. पाटील आणि असोसिएट प्रोफेसर जोनास ऑर्टेग्रेन यांच्या समारोपपर मनोगताने झाला.

या उपक्रमाला विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज एस. पाटील, पृथ्वीराज एस. पाटील, कुलगुरू डॉ. राकेशकुमार शर्मा आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.

या परिषदेमुळे भारत आणि स्वीडनमधील संशोधन सहकार्य, ज्ञानाची देवाणघेवाण आणि शाश्वत भविष्यासाठीच्या आधुनिक तंत्रज्ञान संशोधनाला नवी दिशा मिळण्यास मदत होणार आहे.


डी. वाय. पाटील विद्यापीठात नॅनोतंत्रज्ञानावर आंतरराष्ट्रीय परिषद
Total Views: 7