बातम्या

डी. वाय. पाटीलमध्ये सायबर हायजीन MUN २०२६ परिषद उत्साहात

dypatil cyber hygiene mun 2026 kolhapur


By Shivani - 10/27/2026 5:58:36 PM
Share This News:



सायबर सुरक्षिततेसाठी जागरूकता आणि सतर्कता आवश्यक; पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांचे आवाहन

कोल्हापूर :

डिजिटल युगात इंटरनेटचा सुरक्षित वापर, वैयक्तिक माहितीची गोपनीयता आणि ऑनलाइन फसवणुकीपासून संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने जागरूक व सतर्क राहणे आवश्यक आहे, असे आवाहन कोल्हापूर सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांनी केले. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथे आयोजित ‘सायबर हायजीन मॉडेल युनायटेड नेशन्स २०२६’ या दोन दिवसीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

सायबर सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता

२४ आणि २५ ऑक्टोबर रोजी आयोजित या परिषदेचे आयोजन भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या माहिती सुरक्षा शिक्षण व जागरूकता (ISEA) प्रकल्पाच्या सहकार्याने, सी-डॅक आणि सर्ट-इन यांच्या सहयोगातून करण्यात आले. संस्थेचे संचालक डॉ. अजित एस. पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

यावेळी सर्ट-इनचे डॉ. कपिल वानखेडे आणि सी-डॅक, मुंबईचे दिव्यांश बघेल विशेष परीक्षक म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेचे ज्ञान आत्मसात करून ते समाजातील इतरांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन डॉ. कपिल वानखेडे यांनी केले.

आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर विद्यार्थ्यांचा युक्तिवाद

या परिषदेत संयुक्त राष्ट्र महासभा (UNGA) आणि संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद (UNHRC) या समित्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा केली. यामध्ये युक्तिवाद, राजनैतिक वाटाघाटी आणि ठराव प्रक्रियेचा समावेश होता. विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे आकलन, नेतृत्वगुण, संवादकौशल्य आणि निर्णयक्षमता विकसित करण्याची संधी मिळाली.

अभिलाषा अडसूळे, सई आवळे, हृषिकेश शाहणे आणि पार्श्वजीत पाटील यांनी विविध समित्यांचे संचालन केले. अंजिलाह धळाईत हिने आंतरराष्ट्रीय पत्रकारिता विभागाचे नेतृत्व केले.

सायबर हायजीन MUN २०२६ मधील पुरस्कार विजेते

संयुक्त राष्ट्र महासभा (UNGA) समिती

  • उत्कृष्ट प्रतिनिधी : रिभव उमेश बालखंडे (एस्टोनिया)

  • विशेष प्रशंसापत्र : निलय कुलकर्णी

  • विशेष उल्लेख : ध्रुव घोरपडे

  • उत्कृष्ट वक्ता : हनी आदित्य प्रताप सिंग

  • उत्कृष्ट स्थितिपत्र : ईशा सरदेसाई

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद (UNHRC) समिती

  • उत्कृष्ट प्रतिनिधी : समीक्षा मंथन गवळी (युनायटेड किंगडम)

  • विशेष प्रशंसापत्र : साई उमेश धुमाळे

  • विशेष उल्लेख : गार्गी जिरगे

  • उत्कृष्ट वक्ता : रुतुजा अविनाश पुजारी

  • उत्कृष्ट स्थितिपत्र : श्रेयस राजेंद्र चोरगे

परिषदेतील उत्कृष्ट पत्रकार म्हणून सुमेरा शेख हिचा गौरव करण्यात आला. विविध समित्यांमधील प्रभावी सहभाग आणि सादरीकरणासाठी विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती; आयोजकांचे मार्गदर्शन

या कार्यक्रमाला डेप्युटी रजिस्ट्रार अश्विन देसाई, संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. ग्रंथेज ओतारी आणि डेटा सायन्स अभियांत्रिकी विभागप्रमुख तानाजी पाटील उपस्थित होते. प्रा. अमृत काजवे यांनी परिषदेचे समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली.

संस्थेचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज एस. पाटील व पृथ्वीराज एस. पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन या उपक्रमाला लाभले.

डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर लक्षात घेता, सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे, ऑनलाइन धोके ओळखणे आणि जबाबदार डिजिटल नागरिक घडवणे या उद्देशाने आयोजित ही परिषद विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरली.


डी. वाय. पाटीलमध्ये सायबर हायजीन MUN २०२६ परिषद उत्साहात
Total Views: 10