शैक्षणिक

टीईटी बीएलओसह विविध मागण्यांसाठी ९ जुलैला शिक्षकांचा राज्यव्यापी बंद

education deparment teacher protest 9july school may be closed state level


By nisha patil - 1/7/2026 4:03:28 PM
Share This News:



मुंबई :

राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी. शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ९ जुलै रोजी राज्यभर राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असून, त्यासाठी शिक्षक संघटनांनी सामूहिक रजा घेऊन शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शाळांमधील शैक्षणिक कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिक्षक संघटनांच्या म्हणण्यानुसार, टीईटी पेपरफुटी प्रकरणातील कारवाई, शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा वाढता बोजा, टीईटी सक्ती, संचमान्यता धोरण, बीएलओ नियुक्ती तसेच इतर प्रलंबित प्रश्न यावर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.

या आंदोलनात राज्यातील विविध शिक्षक संघटना सहभागी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले असून, आंदोलन अधिक व्यापक करण्यासाठी सामूहिक रजेच्या माध्यमातून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय संघटनांच्या स्तरावर घेण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हानिहाय आणि शाळानिहाय परिस्थितीनुसार शैक्षणिक कामकाजात बदल होऊ शकतो.

दरम्यान, ९ जुलै ही शासनाने घोषित केलेली अधिकृत सुट्टी नाही, हे स्पष्ट करण्यात आले आहे. शाळा बंद ठेवण्याचा निर्णय हा शिक्षक संघटनांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेला असून, शासनाने राज्यभर सुट्टी जाहीर केलेली नाही. त्यामुळे कोणत्या शाळा सुरू राहतील आणि कोणत्या बंद राहतील, हे संबंधित शाळेतील शिक्षकांच्या आंदोलनातील सहभागावर अवलंबून असेल.

पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आपल्या संबंधित शाळेकडून मिळणाऱ्या अधिकृत सूचनांची खात्री करूनच शाळेत जाण्याबाबत निर्णय घ्यावा, असे आवाहनही करण्यात येत आहे.


९ जुलैला शिक्षकांचा राज्यव्यापी एल्गार; सामूहिक रजेमुळे अनेक शाळा बंद राहण्याची शक्यता
Total Views: 8