बातम्या

पन्हाळगडावर एक दिवा राजांसाठी उपक्रम; शिवमंदिरात दीपोत्सव

ek diva raajansathi panhala fort diwali padwa


By Administrator - 11/14/2026 3:11:15 PM
Share This News:



पन्हाळगडावर ‘एक दिवा राजांसाठी’ उपक्रम उत्साहात; शिवमंदिरात दीपोत्सव साजरा!

पाडव्याच्या मुहूर्तावर सकल मराठा समाज यड्रावतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन; सलग तिसऱ्या वर्षी उपक्रमाचे आयोजन

पन्हाळा :

दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पन्हाळगडावर ‘एक दिवा राजांसाठी’ हा अनोखा उपक्रम उत्साहात पार पडला. सकल मराठा समाज यड्रावच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यड्राव येथील ग्रामदैवत श्री रिद्धी-सिद्धी मंदिरात आरती केल्यानंतर सकल मराठा समाजाचे सदस्य पन्हाळगडावर दाखल झाले. येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करून आरती करण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्वलन करत ‘एक दिवा राजांसाठी’ हा उपक्रम साजरा करण्यात आला.

ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला स्वराज्य दिले, स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली आणि सामान्य माणसाला न्यायाने जगण्याचा मार्ग दाखवला, अशा युगपुरुषाप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमात सकल मराठा समाज यड्रावचे शिवाजी दळवी, इतिहासप्रेमी विजय माने, संदीप माने, शशिकांत कोकाटे, संतोष दावाडे, विनोद साळुंखे, रवी भोसले, कुणाल धुमाळे आदी सहभागी झाले होते.

‘एक दिवा राजांसाठी’ या संकल्पनेतून इतिहासाचे स्मरण, छत्रपती शिवाजी महाराजांप्रती कृतज्ञता आणि स्वराज्याच्या विचारांचा जागर करण्यात आला. दिवाळीच्या प्रकाशपर्वात महाराजांच्या चरणी एक दिवा अर्पण करण्याचा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.

 


पन्हाळगडावर एक दिवा राजांसाठी उपक्रम; शिवमंदिरात दीपोत्सव
Total Views: 28