राजकीय

महायुतीच्या माध्यमातूनच सर्व निवडणुका लढवणार – चंद्रकांतदादा पाटील

elections in 2026 by mahayuti


By nisha patil - 6/8/2025 7:58:28 PM
Share This News:



कोल्हापूर, दि. ६ :आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्ष जोरदार तयारीला लागला असून या सर्व निवडणुका महायुतीच्या माध्यमातूनच लढवल्या जातील, असा ठाम विश्वास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नाम. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.

आज कोल्हापूर जिल्हा भाजप कार्यालयात आयोजित संघटनात्मक बैठकीत तीन जिल्ह्यांतील भाजप पदाधिकाऱ्यांसोबत दादांनी सविस्तर चर्चा केली. प्रत्येक जिल्हा परिषद गट व नगरपालिका क्षेत्रातील राजकीय समीकरणांचा आढावा घेतला. कोल्हापूर जिल्ह्यातील ६८ जिल्हा परिषद गटांमधील राजकीय स्थिती आणि महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतींच्या तयारीवरही चर्चा झाली.

दादांनी सांगितले की, भाजपची कार्यपद्धती ही मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर आधारित असून, सरकारने राबवलेल्या कल्याणकारी योजनांचा लाभ गोरगरिबांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य कार्यकर्त्यांनी हाती घ्यावे. तसेच जनसंपर्क वाढवून समाजाच्या प्रत्येक घटकाशी जोडले गेले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

भाजपचे संघटन हे बळकट असून, कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन सरकारच्या योजनांची माहिती द्यावी व पक्षाची ताकद वाढवावी, असेही ते म्हणाले.

या बैठकीस भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेशराव हाळवणकर, आमदार अमल महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील, आमदार राहुल आवाडे, माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नाथाजी पाटील, राजवर्धन नाईक निंबाळकर, राहुल चिकोडे, शौमिका महाडिक, तसेच विविध पदाधिकारी, नगरसेवक, मंडल अध्यक्ष व मोर्चा अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.


तारा न्यूज | कोल्हापूर)


महायुतीच्या माध्यमातूनच सर्व निवडणुका लढवणार – चंद्रकांतदादा पाटील
Total Views: 127